यंदा दिवाळी आली तरी पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. लांबलेला पाऊस हा ऋतुचक्राचे वेळापत्रक बदलल्याचे संकेत देत आहे. ३० सप्टेंबर रोजी मान्सून संपल्याचे हवामान खात्याने जाहीर करूनही मागील १५ दिवस महाराष्ट्रासह देशातील काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्याचा परिणाम म्हणून यंदा हिवाळा उशिरा सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिवाळीनंतर थंडी!
जरी पावसाचे मोसमी वारे महाराष्ट्रातून निघून गेले असले तरी समुद्रात सतत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे पावसाचा कालावधी वाढत आहे. त्यातूनच हा परिणाम दिसून येत असल्याचे हवामान शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता थंडी अनुभवण्यासाठी नोव्हेंबरच्या मध्यान्हापर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा कालावधी पावसाचा हंगाम मानला जातो. ऋतुचक्राच्या वेळापत्रकानुसार ऑक्टोबरपासून हिवाळा सुरु होतो. विशेष म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीपासून तापमान वाढते ज्याला ‘ऑक्टोबर हिट’ म्हणून ओळखले जाते. यंदाचा पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यात हजर झाला खरा, मात्र एकाच महिन्यात तो देशभर पसरला होता आणि परतीचा प्रवास मात्र १५ दिवस उशिराने सुरु केला. तरीही बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. हा पाऊस तुरळक ठिकाणी १८ ऑक्टोबरपर्यंत कायम होता.
(हेही वाचा : ठाण्यात सेना-राष्ट्रवादीत रंगला ‘सामना’!)
थंडीच्या कालावधीवरही परिणाम होणार?
हवामान बदलांमुळे दिवाळीत थंडी अवतरण्याचा कालावधी उरलेला नाही. त्याचप्रमाणे ऑक्टोबरमधील तापमानवाढीची तीव्रताही कमी झाली आहे. गेल्या काही वर्षांत पावसाचा कालावधी वाढत चालला आहे. त्यामुळे थंडी अवतरण्याचा कालावधी पुढे जातो आहे. नोव्हेंबरच्या कालावधीत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळेही थंडीवर परिणाम होण्याची शक्यता वर्नवली जात आहे.
Join Our WhatsApp Community