- सचिन धानजी,मुंबई
मुंबई महापालिकेच्या कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सध्या मराठा सर्वेक्षणासाठी जुंपले गेले आहे. आधीच महापालिकेत ४० ते ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यातच निवडणूक कामांसाठी कर्मचारी गेलेले आहेत आणि आता मराठा सर्वेक्षणासाठी सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांचे आदेश काढले गेल्याने महापालिकेच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरलेला आहे. त्यातच आता येत्या फेब्रुवारीपासून निवडणूक कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांकडून मागणी होत आहे. त्यामुळे महापालिकेत कर्मचारीच नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची कामे खोळंबली गेली आहेत. परिणामी महापालिकेच्या कार्यालयाला आता टाळे ठोकण्याची वेळ आल्याची चर्चा कर्मचाऱ्यांसह लोकांमध्ये रंगू लागली आहे. (BMC)
रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सना वगळले
मराठा सर्वेक्षणाच्या कामासाठी महापालिकेचे तब्बल ३० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेच्या अनेक कार्यालयांमधील कामकाजालाच खिळ बसली आहे. अनेक विभागांमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी उरले असून अनेक महत्वाची प्रशासकीय कामे करण्यास या कर्मचाऱ्यांअभावी मोठ्या अडचणी येत आहे. या मराठा आरक्षणासाठी प्रथमच अभियंत्यांवरही जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे महत्वाच्या विकास कामे व प्रकल्पांची कामे हाताळणारे अभियंते आता घरोघरी जाऊन लोकांच्या जातीसह इतर प्रकारची माहिती संकलित करत आहेत. रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांना यातून वगळले असले तरी रुग्णालयातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांनाही या कामाला जुंपल्याने रुग्णालयातील अनेक प्रशासकीय कामांमध्ये अडचणी येत आहे. (BMC)
आधीच अनेक पदे रिक्त
एवढेच नाही महापालिकेच्या २४ विभाग कायालयांमधील सुमारे ४० ते ५० टक्के कर्मचाऱ्यांवर मराठा सर्वेक्षणाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे जिथे लोकांचा थेट संपर्क येतो, तिथेही कर्मचारी जागेवर नसल्याने अनेकांना निराश होत परतावे लागते. महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी आधीच निवडणूक कामांसाठी जुंपले गेले आहे, त्यामुळे आधीच अनेक विभागांमध्ये कर्मचारी कमी आहे. अनेक पदे रिक्त असल्याने आधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यातच निवडणूक आणि मराठा कामांसाठी जुंपल्याने महापालिकेच्या कामांनाच खिळ बसली गेली आहे. (BMC)
(हेही वाचा – Mumbai Fire Brigade : मुंबई अग्निशमन दलातील ६ जवानांना राष्ट्रपतींचे ‘गुणवत्तापूर्ण सेवा पदक’)
केवळ २७ हजार कर्मचाऱ्यांमध्ये कामे कशी करायची
महापालिकेत सुमारे ९२ हजार कर्मचारी असून त्यातील सुमारे २९ हजार कर्मचारी हे घनकचरा व्यवस्थापन विभागातील चतुर्थ श्रेणीतील आहेत. त्यांना यातून वगळले आह. त्यामुळे निवडणूक कामांसाठी यापूर्वीच सुमारे पाच ते सहा हजार कर्मचारी गेले आहेत. ही संख्या विचारात घेता सुमारे ६५ हजार कर्मचारी वगळता महापालिकेत केवळ २७ हजार कर्मचारी व अधिकारी शिल्लक राहत असून त्यातीलही अनेक कर्मचारी सुट्टीवर असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांच्या जोरावर कामे करायची कशी असा सवाल अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्यातच आता येत्या १ फेब्रुवारी पासून शहराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १५ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे महापालिकेला कळवले आहे. (BMC)
शासकीय कर्मचाऱ्यांना सुट
मुंबईकरांना पायाभूत सेवा सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही महापालिकेची असून हा कर्मचारी वर्गच नसल्याने थेट मुंबईकरांच्या दैनदिन कामांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता असते. निवडणूक आणि मराठा सर्वेक्षण ही कामे राज्य आणि केंद्र शासनाशी निगडीत असल्याने या दोन्ही शासनातील तसेच त्यांच्याशी संलग्न निम शासकीय कर्मचाऱ्यांची निवडणूक तसेच मराठा सर्वेक्षणासाठी मदत घेणे आवश्यत असताना शासनाने या कर्मचाऱ्यांना सुट देत केवळ महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिमतीला लावले आहे. (BMC)
(हेही वाचा – Pune : पुण्याचे बालगंधर्व रंगमंदिर ‘या’ कारणांसाठी राहणार महिनाभर बंद)
कर्मचारी नसल्याचा फटका अधिकाऱ्यांना
एका बाजुला सुशोभित मुंबई, सखोल स्वच्छता मुंबई अशाप्रकारचे अभियान राबवून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर आधीच कामाचा बोजा टाकणाऱ्या सरकारला निवडणूक आणि मराठा सर्वेक्षणाच्या कामातही महापालिका कर्मचाऱ्यांची आठवण होत, सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा विसर पडतो. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी आता हतबल झाले आहेत. कर्मचारी नसल्याने लोकांची कामे होत नाही. कामांचा पाठपुरावा करणाऱ्या लोकांचा रोष अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. (BMC)
महापालिकेची तिजोरीही होत आहे रिकामी
मात्र हाताखालचा कर्मचारी नसल्याचा फटका अधिकाऱ्यांनाही बसत असल्याने महापालिकेला आता टाळे लावूनच बसायची वेळ आली आहे असा त्रागा ऐकायला मिळत आहे. एका बाजुला महापालिकेची तिजोरी रिकामी होत आहे, दुसरीकडे महापालिकेचा महसूल वाढणाऱ्या रकमेची वसूली करता येत नसल्याने भविष्यात महापालिकेला टाळेच लावण्याची वेळ येणार आहे, अशीच चिंता कर्मचारी व अधिकारी व्यक्त करताना दिसत आहेत. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community