यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने आषाढीच्या पायी वारीला परवानगी नाकारली. एव्हाना मनाच्या पालख्यांपैकी काही पालख्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाडीतून पंढरपूरच्या दिशेने निघाल्या. त्यामुळे पायी नाराज वारकरी बांधवाना काही प्रमाणात पायी वारीचा आनंद घेता यावा याकरता राज्य सरकारने वाखारी येथून पुढे दीड किमी पायी वारीला परवानगी दिली आहे.
भाजपने पायी वारीसाठी धरलेला आग्रह!
यासंबंधीचा आदेश राज्य सरकारने १४ जून रोजी काढला. या आदेशात म्हटल्याप्रमाणे १० मानाच्या पालख्यांना एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. पुढे त्या वखारीत पोहचल्यानंतर तेथून पुढे पंढरपूर विठ्ठल मंदिरापर्यंत दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यंदाची आषाढी वारी पायी चालत करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी वारकरी आणि महाराज मंडळींकडून करण्यात येत होती. भाजप नेत्यांनीही नियम घालून पायी वारीला परवानगी देण्याची मागणी केली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने यंदाही एसटी बसने पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
(हेही वाचा :वारकरी बांधवांनो, यंदाही विठ्ठलाला घरूनच नमस्कार करा!)
१९५ वारकरी बांधवांनाच मुखदर्शनाची परवानगी!
सरकारच्या आदेशानुसार यंदाही मानाच्या १० पालख्यांना एसटी बसनेच पंढरपूरकडे प्रस्थान करावे लागणार आहे. मात्र, राज्य सरकारने वाखरीपासून दीड किलोमीटरचे अंतर केवळ पालखीसोबत असलेल्या वारकरी बांधवांनाच पायी जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच विठ्ठल-रुख्मिणीच्या शासकीय महापूजाही मागील वर्षीप्रमाणे नियम पाळूनच होणार आहे. आषाढी एकादशीला सरकारने परवानगी दिलेल्या १९५ संत, महाराजांना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. तर पौर्णिमेलाच काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पालख्या परत माघारी जातील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community