जे मुख्यमंत्री माझे कुटुंब माझी जबाबदारी या पलिकडे कधी गेले नाही आणि जे स्वत: घरात बसून राहिले अशा अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांना कार्यक्षम उपमुख्यमंत्री कळणार नाहीत, अशी टीका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी सोमवारी केली. उद्धव ठाकरे यांची ओळख घरबस्या मुख्यमंत्री अशी झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख मस्टर उपमुख्यमंत्री असा केला होता. या टीकेला शेलार यांनी आज उत्तर दिले. भाजपची चिंता तुम्ही करु नका. तुमचे चिन्ह गेले, तुमचा पक्ष गेला, नेतृत्व राहिले नाही, तुमचे संविधान गेले, तुमचे आमदार गेले, तुमचे खासदार गेले त्यांची चिंता तुम्ही करा. त्यामुळे सातत्याने दुसऱ्याच्या घरात डोकावून बघण्याचे सोडा. आमच्या नेतृत्वावर तुम्ही बोलू नका, तुमचे आमदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटा दाखवून निवडून आले होते. तुमचे सुपूत्र मोदी यांचा फोटा लावून निवडून आले आहेत हे विसरु नका, असे शेलार यांनी म्हटले आहे.
हिंदू जनआक्रोश मोर्चावर केलेल्या टीकेला उत्तर देताना शेलार म्हणाले की, तुमचे जे पाकडयांवरचे प्रेम आहे ते जनतेसमोर मांडण्यासाठीच हे मोर्चे निघत आहेत. आपली औरंगजेबाप्रती असलेली निष्ठा हे उघड करण्यासाठी हे मोर्चे आहेत. हिंदू एकत्र आले की तुम्हाला त्रास का होतो, असा सवालही त्यांनी केला आहे? गेली पंधरा वर्षांची त्यांची भाषणे ऐकली तर याच्या छाताडावर बसू, त्याच्या छाताडावर बसू यापेक्षा वेगळे काय बोलतात? असा प्रश्नही शेलार केला आहे.
Join Our WhatsApp Community