मुंबई-सिंधुदुर्ग सागरी महामार्गाला आता गती मिळणार आहे. त्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थसहाय्य करणार असून, राज्यातील अन्य पायाभूत विकास प्रकल्पांना अशाप्रकारची मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
( हेही वाचा : राज्यातील ‘या’ चार परिचारिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते झाला सन्मान)
एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या शिष्टमंडळाने सोमवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील विविध पायाभूत आणि सामाजिक आर्थिक उन्नती साधणाऱ्या प्रकल्पांविषयी चर्चा करण्यात आली. मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे कार्यकारी संचालक समीरकुमार खरे, चिंताले वाँग, सेर्जिवो लुगॅरेसी, ताकीओ कोनाशी यांच्यासह राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यावेळी उपस्थित होते.
सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी समूह विकास प्रकल्पांसोबतच राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प, पर्यावरण स्नेही नवीन महाबळेश्वर प्रकल्प, पर्यटनाला चालना देणारा मुंबई सिंधुदूर्ग सागरी महामार्ग प्रकल्प तसेच नदीजोड प्रकल्प, नाशिक, ठाणे आणि पुणे मेट्रो प्रकल्पांना एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करावे. महाराष्ट्राच्या विकासाचे ध्येय घेऊन राज्य शासन वेगवान निर्णय घेत आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन कृषी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यातील जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी आमचे प्रयत्न असून, पायाभूत प्रकल्पांना एशियन डेव्हपलमेंट बँकेने आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
एसटीच्या ताफ्यात ५ हजार १५० इलेक्ट्रीकल बसेस
नदी जोड प्रकल्प, वाया जाणारे पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठीचा प्रकल्प, तसेच राज्य परिवहन मंडळासाठी ५ हजार १५० इलेक्ट्रीकल बसेस, ५ हजार डिजेल बसेसचे सीएनजीवर रुपांतर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला सहकार्य केले जात आहे, अशी माहिती एडीबी बँकेच्या शिष्टमंडळाने दिली. राज्यात सुरू असलेल्या कामांविषयी शिष्टमंडळातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
Join Our WhatsApp Community