Assembly Elections : मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी राजकीय पक्षांचेही सहकार्य अपेक्षित

190
Assembly Elections : मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी राजकीय पक्षांचेही सहकार्य अपेक्षित
विधानसभा निवडणूक २०२४ (Assembly Elections) च्या पार्श्वभूमीवर, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या राज्यात दुसरा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अर्थात मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये नवमतदारांना नाव नोंदणीसह विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सदर कार्यक्रमाची प्रशासनाने जनजागृती केली आहे. त्यासोबत, राजकीय पक्षांनीही आपापल्या परीने या कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरुन मतदार नोंदणीचे पर्यायाने मतदानाचे प्रमाण वाढवण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिका आयुक्त  भूषण गगराणी यांनी केले.
विधानसभा निवडणूक २०२४ (Assembly Elections) च्या पार्श्वभूमीवर, विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी १६ ऑगस्ट २०२४ रोजी बैठक पार पडली. जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आढावा बैठकीमध्ये विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.  तसेच, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त  आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त  आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी  संजय यादव, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी  राजेंद्र क्षीरसागर तसेच महानगरपालिकेचे सहआयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) विजय बालमवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनीही एकत्रित यावे 
विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections) प्रशासनातर्फे विविध कामकाज सुरु आहे. पैकी, छायाचित्रासह मतदार यादींचा संक्षिप्त पुनरीक्षण (दुसरा) कार्यक्रम सध्या राबविण्यात येत आहे. मतदारांची नोंदणी वाढावी, यासाठी प्रशासनाने वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती देखील केली आहे. सध्या सुरु असलेला मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम येत्या २० ऑगस्ट २०२४ पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यानंतर दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नवमतदारांची नोंदणी, मतदारांच्या नावासमवेत मोबाईल क्रमांक जोडणे इत्यादी प्रक्रियांची माहितीही या बैठकीत देण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी त्यावर आपापली मते व सूचना मांडल्या.
यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, मुंबईत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचतानाच मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी यंत्रणांच्या प्रयत्नांना राजकीय पक्षांनी देखील आपापल्या परीने सहकार्य करण्याची गरज आहे. मतदारांना अधिकाधिक सुलभ पद्धतीने मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी यंत्रणेसोबतच राजकीय पक्षांनीही एकत्रित प्रयत्न करावेत. सध्या मुंबई महानगरात मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी करण्यात यावी, जेणेकरुन अधिकाधिक मतदार नोंदवले जातील, अशी सूचना गगराणी यांनी केली.
१५०० मतदारांची संख्या ही आता सरासरी १००० ते १२०० पर्यंत
अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकार संजय यादव आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी माहिती देताना सांगितले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यानचा अनुभव लक्षात घेता मुंबईत मतदान केंद्रांच्या रचनेत अधिक सूसूत्रीकरण करण्यात आले आहेत. तसेच राजकीय पक्षांनाही नव्या मतदार याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परिणामी, प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पूर्वी असणारी सरासरी १५०० मतदारांची संख्या ही आता सरासरी १००० ते १२०० पर्यंत असेल. त्यामुळे मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार आहे. याचाच अर्थ मतदानाचे प्रमाण व वेग वाढेल. या मतदान केंद्राची माहिती मतदारांपर्यंत पोचवण्यासाठी राजकीय पक्षांनीही सहकार्य करावे. तसेच याआधी काही परिसरामध्ये तुलनेने अधिक मतदान केंद्र होते. त्यांच्या रचनेतही सूसूत्रता आणण्यात आली आहे.
सहकारी गृहनिर्माण संस्था असो वा झोपडपट्टी परिसर, या सर्वांची मागणी व आवश्यकता लक्षात घेता मतदार संख्या व परिसर यांचा योग्य ताळमेळ करण्यात आला आहे. अशारितीने मतदान केंद्रांचे सुयोग्य पुनर्नियोजन केले आहे. या सर्वांचा फायदा मतदानाच्या प्रक्रियेत सहभाग वाढण्यासाठी होईल, असा विश्वास यादव व क्षीरसागर यांनी व्यक्त केला. दरम्यान, मतदान केंद्राच्या सूसूत्रीकरणाची सुधारित माहिती करून देण्यासाठी निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धी प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदान केंद्रांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी Know your polling station हे जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. (Assembly Elections)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.