धारावीत एका शौचालयावर एक कोटींचा खर्च!

107

मुंबईत लॉट ११ अंतर्गत २२ हजार शौचालयांची उभारणी करण्यासाठी प्रत्येक महापालिका प्रशासकीय विभाग कार्यालयांच्या हद्दीत कंत्राटदारांची निवड करण्यात आली. परंतु एका बाजुला शौचालयांच्या बांधकामांसाठी कंत्राटदाराची निवड केलेली असतानाच दुसरीकडे धारावीतील शिवसेनेच्या दोन नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये सहा ठिकाणी शौचालय बांधले जात असून यासाठी तब्बल ६.३०कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे धारावीसारख्या परिसरात एका शौचालयाच्या उभारणीवर सुमारे १ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याचे स्पष्ट  दिसून येत आहे.

२२ हजार ७७४ शौचालयांकरता निविदा काढली!   

संपूर्ण मुंबईत वस्ती स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत एकूण २२ हजार ७७४ शौचालयांकरता निविदा काढून त्याला कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये ८ हजार ६३७ ही नवीन शौचकुपे आणि १४ हजार १३७ जुन्या शौचकुपांच्या जागी पुनर्बांधकाम करण्यात येणार आहे. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी २० हजार ३०१ शौचकुपांचे बांधकाम पूर्ण करण्याचे प्रशासनाचा मानस आहे. त्यापैंकी ४ हजार ५९६ शौचकुपे बांधून तयार झाली आहेत, तर उर्वरीत १५ हजार ७०५ शौचकुपांचे बांधकाम चालू आहे.

(हेही वाचा : घाटकोपरच्या उद्यानात १६४ वर्षांपूर्वीच्या तोफा!)

धारावीत ३०० शौचकुपांसाठी ०९ शौचालयांचे काम हाती  घेण्यात आली!

त्यानसार धारावीमध्ये लॉट १० व लॉट ११ या कंत्राटाअंतर्गत कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. धारावीमध्ये लॉट १०अंतर्गत २७६ शौचकुपांसाठी ०९ शौचालये बांधून पूर्ण झाली असून लॉट ११ अंतर्गत ३०० शौचकुपांसाठी ०९ शौचालयांचे काम हाती  घेण्यात आले होते. त्यातील ०६ शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. धारावीतील लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांचे प्रमाण कमी असल्याने जास्तीत जास्त शौचकुपांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही संख्या वाढवणे खूपच आवश्यक आहे. त्यामुळे धारावीमध्ये जास्त क्षमतेची दुमजली शौचालये बांधण्यात येत आहे.

आरसीसी तळमजला अधिक एक प्रकारच्या शौचालयांचे नियोजन!  

जी उत्तर विभागातील धारावीमधील प्रभाग क्रमांक १८५मध्ये दोन व प्रभाग क्रमांक १८६मध्ये चार अशाप्रकारे सहा आरसीसी तळमजला अधिक एक या प्रकारच्या शौचालयांचे नियोजन, संकल्पचित्रे व बांधकाम करण्यासाठी तसेच त्या शौचालयांची मलकुंडे साफ करण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. यासाठी तनिष एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीला विविध करांसह ६ कोटी ३० लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे.  या शौचालयांची उभारणी पुढील १२ महिन्यांमध्ये करणे बंधनकारक आहे.

धारावीत कुठे बांधले जाणार हे शौचालय?

  • १८५ : ब्लॉक नंबर १, जीवनज्योत रहिवाशी संघ,धारावी
  • प्रभाग १८५ : ४ आसनी शौचालय, लक्ष्मी बाग, धारावी
  • प्रभाग १८६ :  भारतीय चाळ ढोरवाडा, धारावी
  • प्रभाग १८६ : राजीव गांधी नगर, ढोरवाडा, धारावी
  • प्रभाग १८६ : गोपीनाथ कॉलनी तळ अधिक एक मजला शौचालय
  • प्रभाग १८६ : टिकटिकवाला शौचालय, ढोरवाडा,धारावी
  • प्रभाग १८६ : धारावी कादरी मस्जिद, ढोरवाडा,धारावी
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.