पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत १७ हजार ७५८ प्रवाशांना मासिक पास वितरित

ज्‍या सर्वसामान्‍य नागरि‍कांना कोविड लशीचे दोन डोस घेतल्‍यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्‍यांचे लसीकरण अंतिम प्रमाणपत्र व छायाचित्र असणारे ओळखपत्र पडताळण्यात येत आहे.

149

मुंबईतील सर्वसामान्‍य नागरिकांना येत्‍या १५ ऑगस्‍ट २०२१ पासून उपनगरीय रेल्‍वे प्रवास करण्‍यास मुभा देण्‍याची घोषणा राज्‍याचे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर, बुधवारी, ११ ऑगस्ट रोजी मुंबईतील ५३ रेल्‍वे स्‍थानकांवर ३५८ मदत कक्ष सुरू करण्‍यात आले. या पहिल्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत १८ हजारांहून अधिक नागरिकांची पडताळणी पूर्ण करुन, त्यातील १७ हजार ७५८ प्रवाशांना मासिक पासचे वितरण करण्यात आले. प्रत्येक रेल्वे स्थानकांवर लसींचे दोन डोस घेणाऱ्यांना ही विशेष व्यवस्था देण्यासाठी महापालिकेच्यावतीने एक कनिष्ठ अभियंता व दोन लिपिक यांची प्रत्येक सत्रासाठी नेमणूक करण्यात आली आहे. परंतु महापालिकेच्या या पथकाला रेल्वेकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. त्यांना बसण्यासाठी लागणाऱ्या खुर्च्या तसेच पंख्याची व्यवस्थाही रेल्वेने न दिल्याने काही अभियंत्यांनी थेट आयुक्तांकडेच तक्रार केल्याची माहिती मिळत आहे.

New Project 1 6

५३ रेल्वे स्थानकांवर मिळून ३५८ मदत कक्ष कार्यान्वित झाले

कोविडच्या दोन लसीच्या मात्रा घेणाऱ्यांना रेल्वे प्रवास १५ ऑगस्टपासून खुला करून देण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या दोन डोस घेणाऱ्यांना रेल्वे पास मिळण्याकरता सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील एकूण ५३ रेल्वे स्थानकांवर मिळून ३५८ मदत कक्ष कार्यान्वित झाले आहेत. बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंतच्या पहिल्या सत्रात या सर्व ५३ स्थानकांवर मिळून एकूण १८ हजार ३२४ रेल्वे प्रवाशांची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. या पडताळणीनंतर नागरिकांना मासिक पास देण्याच्या कार्यवाहीची सुरुवात रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार बुधवार दुपारपर्यंत पहिल्या सत्रात १७ हजार ७५८ मासिक पास देण्यात आले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेद्वारे १२ हजार ७७१, तर पश्चिम रेल्वेद्वारे देण्यात आलेल्या ४ हजार ९८७ मासिक पासांचा समावेश आहे. दररोज सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सलग २ सत्रामध्‍ये मदत कक्ष कार्यरत असणार आहेत. यामुळे विनाकारण गर्दी न करता नागरिकांनी आपल्‍या घराजवळील रेल्‍वे स्‍थानकांवर पडताळणीकरिता जावे, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

(हेही वाचा : १५ ऑगस्टपासून हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत परवानगी!)

कुणाला मिळणार रेल्वे पास?

ज्‍या सर्वसामान्‍य नागरि‍कांना कोविड लशीचे दोन डोस घेतल्‍यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहेत, त्‍यांचे लसीकरण अंतिम प्रमाणपत्र व छायाचित्र असणारे ओळखपत्र पडताळण्यात येत आहे. या ऑफलाईन पडताळणीमध्‍ये पात्र ठरलेल्‍यांना रेल्वेकडून मासिक पास दिला जात असून त्याआधारे उपनगरीय रेल्‍वे प्रवासाची मुभा देण्‍यात आली आहे. सकाळी ७ वाजेपासून मुंबईतील ५३ रेल्वे स्थानकांवर ही प्रक्रिया सुरु झाली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पश्‍च‍िम रेल्‍वे मार्गावरील प्रभादेवी रेल्‍वे स्‍थानक व नंतर दादर रेल्‍वे स्‍थानक येथे नगरसेविका प्रि‍ती पाटणकर, उप आयुक्‍त (परिमंडळ – २) हर्षद काळे, रेल्‍वे अधि‍कारी व पोलिस अधिकारी यांचे समवेत भेट देऊन पाहणी केली. तसेच दादर (पश्‍चि‍म) रेल्‍वे स्‍थानकावरील मदत कक्षास महापौरांनी तसेच अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्‍चि‍म उपनगरे) सुरेश काकाणी यांनी भेट दिली. यावेळी जी उत्‍तर विभागाचे सहायक आयुक्‍त किरण दिघावकर हेही उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.