मित्राची वाट पहात कारमध्ये बसलेल्या फॅशन डिझायनर असलेल्या तरुणीला चाकुचा धाक दाखवून लुटल्याची घटना मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्गावर घडली. या लुटमारीत तरुणी जखमी झाली असून लुटारूने तिच्या गळ्यातील सोनसाखळीसह झाडाझुडपातून पळ काढला आहे. याप्रकरणी नवघर पोलिसांनी अनोळखी चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
चोरट्याकडून चाकू हल्ला!
सायन-चुनाभट्टी येथे राहणारी २४ वर्षांची फॅशन डिझायनर असलेली तरुणी बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुलुंड पूर्व द्रुतगती महामार्गावरील सरदार तारासिंग गणेश विसर्जन तलाव या ठिकाणी मोटरची वाट पहात कारचे दरवाजे लॉक न करता कारमध्ये एकटीच बसलेली होती. त्याचवेळी २० ते २५ वयोगटातील चोरटा कारचे पुढचे दार उघडून कारमध्ये शिरला आणि त्याने या तरुणीच्या गळ्याला चाकू लावून तिच्याजवळील वस्तू लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणीने त्याला विरोध करताच त्याने तिच्यावर चाकुने हल्ला करीत तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून कारमधून बाहेर येत महामार्गाच्या कडेला असलेल्या झाडाझुडपातून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीने याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अनोळखी चोराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
(हेही वाचा : विद्यार्थ्यांची फरफट, शिक्षकांना लागली घरघर! राज्यात शिक्षणाचा खेळखंडोबा!)
महिनाभरातील तिसरी घटना!
मुलुंड पूर्व परिसरात मागील काही महिन्यापासून सोनसाखळीच्या गुन्ह्यात वाढ झालेली आहे, १६ जून रोजी एकाच दिवशी सोनसाखळी चोरांनी दोन वयोवृद्धांवर हल्ला करून सोनसाखळी खेचून पोबारा केला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अद्याप या दोन्ही गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नसताना बुधवारी तरुणीवर चोरांनी केलेल्या हल्ल्याची तिसरी घटना घडली. वाढत्या चोरी, सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Join Our WhatsApp Community