पतीची इच्छा आणि मुलांचा पाठिंबा याच्या जोरावर ५३ व्या वर्षी महापालिकेच्या सफाई कामगार असलेल्या मणीबेन विजय जोगडिया या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहे. विशेष म्हणजे वय वर्षे ५३ आणि परीक्षेत गुणही ५३ टक्केच मिळवण्याचा योगही त्यांनी साधला आहे. केवळ पतीची इच्छा पूर्ण करण्यासाठीच मणीबेन यांनी दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवत खऱ्या अर्थाने आपल्या पतीला श्रध्दांजली वाहिली.
( हेही वाचा : पोलिसांच्या सुट्ट्या रद्द! राज्यासह मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश)
सहकाऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कार्यरत असलेले कर्मचारी हे यापूर्वी दहावी नापास किंवा आठवी ते नवीन उत्तीर्ण असले चालायचे. त्यामुळे सफाई खात्यातील बहुतांशी कर्मचारी कमी शिक्षित असल्याचे दिसून येतात. मात्र, सफाई कामगारांनी दहावीपर्यंत शिकावे अशाप्रकारचे प्रोत्साहन कायमच महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून दिले जाते. अशाचप्रकारे अधिकाऱ्यांकडून मिळालेले प्रोत्साहन व पतीची असलेली तीव्र इच्छा आणि मुलांकडून मिळालेले सहकार्य व पाठिंबा याच्या जोरावर डी विभागातील सफाई कामगार मणिबेन जोगडिया यांनी वयाच्या ५३ व्या वर्षीही दहावीची परीक्षा देतच नाही तर चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत इतर सर्व सहकाऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला.
शिक्षकांचे माझ्या यशात अधिक योगदान
जोगडिया यांनी आपल्या यशाविषयी बोलतांना, याचे श्रेय आपले पती विजय, दोन्ही मुली आणि मुलगा तसेच आपल्या सहकाऱ्यांना आणि शिक्षकांना दिले. त्या म्हणतात, मी दहावीपर्यंतचे शिक्षण करावे ही पतीची इच्छा होती. सन २००९मध्ये मी महापालिकेच्या सेवेत लागली. त्यानंतर पतीच्या इच्छेनुसार मी सन २०१९मध्ये नववीची परीक्षा दिली. त्यात पासही झाली. पण पुढे पतीचे आजार पण त्यात त्यांचे निधन झाल्याने पुढील शिक्षण थांबते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु त्यानंतर २०२१ला दहावीचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेत सँडहस्टर्डमधील मॉडर्न हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. आणि मिळेल त्याप्रमाणे अभ्यास करत हे यश मिळवले. खरं तर मला प्रोत्साहन देणाऱ्या दादर शारदाश्रममधील शिक्षक आणि मॉर्डन नाईट हायस्कूलच्या शिक्षकांचे माझ्या यशात अधिक योगदान आहे. दोन्ही मुलींनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे, तर मुलगाही बीएमएसच्या पहिल्या वर्षाला आहे. त्यामुळे पुढेही शिक्षण घेण्याचा प्रयत्न करेन,असे त्या म्हणाल्या. वय आणि गुणांचे समीकरण जुळवून आणत दहावीच्या परीक्षेत प्राविण्य मिळवणाऱ्या मणीबेन यांचा सत्कार उपायुक्त डॉ संगीता हसनाळे यांनी करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
Join Our WhatsApp Community