शाळांमध्ये शिक्षक नाहीत, विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य वर्ग नाहीत, शिक्षकांवर लादले जाणारे उपक्रम, शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडून मागितली जाणारी माहिती, एका लोकप्रतिनिधींकडून शिक्षकांच्या घरभाड्याबाबत होणारी टीका, शासन शिक्षकांच्या पाठीशी उभे राहात नाही या सर्व गोष्टींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक सामूहिक किरकोळ रजा आंदोलन करणार आहेत.
दापोलीत श्री मंगल कार्यालयात गुणगौरव समारंभात बोलत असताना शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे आपल्या भाषणात ही माहिती दिली. येत्या 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिनी’ हे आंदोलन केले जाणार आहे. दापोलीतील गुणगौरव समारंभात उदय शिंदे बोलत होते.
(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचा शरद पवारांवर पलटवार; लोक माझे सांगाती… पुस्तकाचा दिला संदर्भ )
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून शिक्षक दिनाच्या दिवशी हे आंदोलन होत आहे. याचा अर्थ शिक्षक समिती शिक्षक दिनाचे महत्त्व ओळखत नाही, असा होत नाही. यापूर्वीची आंदोलने शिक्षक दिनाच्या दिवशी झालेली नाहीत का ? हे इतिहासात तपासून पाहिलं पाहिजे? शिक्षक समितीला शिक्षक दिनाच्या दिवशीच आंदोलन करण्याची गरज का भासली याचा विचार व्हावा. यापूर्वी 15 जुलैला आंदोलन केलं होतं, असेही शिंदे म्हणाले.
विद्यार्थ्यांना बसण्यायोग्य इमारती नाहीत. वेगवेगळे एनजीओ शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी उकळण्यासाठी शाळांमध्ये उपक्रम राबवून शिक्षकांना वेठीस धरतात आणि उलट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये गुणवत्ता नाही अशा प्रकारचे अहवाल सादर करतात,असे ते म्हणाले. शासनाला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने पुढाकार घेऊन शिक्षक दिनाच्या दिवशी सामूहिक किरकोळ रजेची नोटिस 11 ऑगस्टला शासनाला दिली आहे.
याप्रसंगी राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, राज्य सल्लागार विजयकुमार पंडित, कोकण विभागीय अध्यक्ष बळीराम मोरे, राज्य कार्यकारणी सदस्य अंकुश गोफणे, जिल्हा कार्याध्यक्ष रुपेश जाधव, जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ प्रवीण काटकर, अध्यक्ष शिक्षक पतपेढी विलास जाधव उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community