दिवाळीनंतर वातावरणात थंडी हळूहळू चोरपावलाने स्पर्श करत असल्याचा अनुभव सातत्याने येत आहे. गुरुवारी राज्यातील बहुतांश भागांत किमान तापमान २० अंशाखाली सरकल्याचे दिसून आले. मराठवाड्यातील औरंगाबाद येथे गुरुवारी राज्यातील सर्वात कमी तापमान नोंदवले गेले. औरंगाबाद येथे १३.२ अंश सेल्सिअस किमान तापमान खाली घरसले. गुलाबी थंडीसाठी डिसेंबर महिन्यापर्यंत उसंत असली तरीही अधूनमधून तापमान खाली सरकत असल्याने ऑक्टोबर हिटला महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांत ब्रेक मिळाला आहे.
औरंगाबाद पाठोपाठ उस्मानाबाद येथे किमान तापमान १३.८ तर महाबळेश्वरला किमान तापमान १३.९ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. नाशिक येथेही किमान तापमान १४ अंश सेल्सिअवर नोंदवल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून दिली गेली. राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याशी संलग्न तसेच उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमान खाली घसरल्याची नोंद हवामान खात्याने केली. वेधशाळेच्या निरीक्षणानुसार, मध्य महाराष्ट्रात सध्या सरासरीच्या तुलनेत तीन ते पाच अंशाने किमान तापमान कमी झाल्याने वातावरणात हलका गारवा अनुभवता येत आहे. विदर्भातही दीड ते तीन अंशाने तापमान कमी नोंदवले जात आहे. त्यातुलनेत मुंबईत मात्र किमान तापमान फारसे कमी झालेले नाही. मुंबईत सध्या किमान तापमान २० अंशाच्या आसपास दिसून येत आहे. मात्र येत्या दोन दिवसांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला.
( हेही वाचा: ATM मधून चक्क खेळण्यातील नोट निघाल्याने खळबळ )
Join Our WhatsApp Community