गेल्या काही दिवसांपासून महागाईने उच्छाद मांडला आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे खाजगी वाहने सोडून वाहतुकीसाठी रिक्षा-टॅक्सीचा वापर करणा-यांच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. टॅक्सी-रिक्षा संघटनांनी परिवहन विभागाकडे भाडेवाढीची मागणी केली असून, परिवहन विभागाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याचे संकेत आहेत.
लवकरच होणार निर्णय
पेट्रोल, डिझेलसोबतच सीएनजीचे दर ही वाढत आहेत. यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळेच या संघखटनांनी परिवहन विभागाकडे भाडेवाढीची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीचा विचार करुन परिवहन विभागाने खटुआ समितीच्या सूत्रानुसार भाडेवाढ करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः महाराजांची भूमिका साकारणा-या चिन्मयनं आपल्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ का ठेवलं? वाचा उत्तर)
काळी-पिवळी महागणार
सीएनजीच्या दरांत 35 टक्क्यांपेक्षाही अधिक वाढ झाली आहे. 2021 च्या ऑगस्ट महिन्यात सीएनजीचा दर किलोमागे 51 रुपये 98 पैसे इतका होता. हाच दर वाढून सध्या 72 रुपये झाला आहे. या वाढत्या दरांमुळेच मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने टॅक्सी भाडे वाढवण्यासाठी परिवहन विभागाकडे शिफारस केली आहे. त्यामुळे टॅक्सीचे सध्याचे किमान भाडे 25 रुपये असून ते पाच रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
महागणार रिक्षा, प्रवाशांना शिक्षा
इंधन महागल्याने रिक्षाचालकांना एका किलोमीटरमागे 1.31 रुपयांच्या अतिरिक्त भुर्दंड भरावा लागत आहे. त्यामुळेच दोन ते तीन रुपयांच्या भाडेवाढीची मागणी मुंबई रिक्षामेन्स युनियनसोबतच इतरही काही संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या रिक्षाचे असलेले किमान भाडे 21 रुपयांवरुन 24 रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रिक्षेच्या दरांत वाढ झाली, तर रोज रिक्षेने प्रवास करणा-यांच्या खिशाला चांगलीच शिक्षा भोगावी लागणार आहे.
(हेही वाचाः भारतातल्या पहिल्या रेल्वेतून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण? माहीत आहे का?)
काय आहे खटुआ समितीचे सूत्र?
खटुआ समितीच्या सूत्रानुसार इंधनाचे वाढते दर आणि त्यामागे चालकांना येणारा खर्च, वाहनाचा दुरुस्ती खर्च, नवीन रिक्षा किंवा टॅक्सीची किंमत, वार्षिक विमा, मोटार वाहन कर इत्यादी मुद्दे विचारात घेऊन रिक्षा तसेच टॅक्सी भाडे निश्चित केले जाते.
Join Our WhatsApp Community