नागपुरातील दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन

129

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीने व एकत्रित न येता, आयोजित करण्याच्या सूचना तसेच गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिल्या आहेत.

मागील दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये “ओमिक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. या ओमिक्रॉन विषाणू प्रजातीचे संक्रमण सामान्य नागरिकांमध्ये व रहिवाश्यांमध्ये फार मोठया तीव्रतेने पसरतो. जास्त गर्दी होणारे सामाजिक कार्यक्रम टाळणे अपरिहार्य आहे. कोविड 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.

घरी राहूनच करावे अभिवादन

महापरिनिर्वाण दिन हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे ओमिक्रॉन या कोरोना विषाणुच्या प्रजातीमुळे कोविड संसर्गाचा वाढलेला धोक्याचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी काळजी घेणे व गांभीर्याने वागणे आवश्यक आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व अनुयायांनी दिक्षाभूमी येथे न येता घरी राहूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे.

याच लोकांना राहता येणार उपस्थित

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दिक्षाभूमी येथे शासकीय मानवंदना देण्यासाठी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जे व्यक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिक्षाभूमी येथे अभिवादन करताना येतील त्यांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असणे बंधनकारक राहील. तसेच भाविकांचे शरीराचे तापमानही तपासण्यात येईल. ज्यांचे तापमान सामान्य असेल त्यांनाच कार्यक्रमात उपस्थित राहता येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण वाढणार नाही.

नियमांचे काटेकोर पालन करावे

महापरिनिर्वाण दिनी कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ, पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येऊ नये. तसेच कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने व मोर्चे काढू नयेत. कोविड-19 व विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणू प्रजातीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर विकास विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय, शिक्षण विभाग तसेच महापालिका, पोलिस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन नागरिकांनी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिल्या.

( हेही वाचा :ऑक्सिजनवरून राजकारण करण्यात आले )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.