ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा रविवारी, १६ एप्रिलला राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थिती लावली होती. तसेच त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी मंत्री उपस्थित होते. या सोहळ्याला राज्यभरातून लाखो श्रीसदस्य नवी मुंबईच्या खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर एकवटले होते. यावेळी पुरस्काराची मिळालेली २५ लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जाहीर केले.
आप्पासाहेब धर्माधिकारी काय म्हणाले?
महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळण्याचे श्रेय हे आपल्या सर्वांचे असल्याचे मत आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. एका घरात दोन वेळा पुरस्कार दिला जातो अशी घटना कुठेही झाली नाही. खेडेगावापासून आम्ही कामाची सुरुवात केली होती. मी प्रसिद्धीपासून लांब आहे. वस्तू महत्त्वाची असेल तर तिची जाहिरात करण्याची गरज काय. तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा नानांच्या आणि आपल्या सर्वांच्या चरणी असल्याचे आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले.
सतकिर्ती वाढवावी, अपकिर्ती थांबवावी
अखेरच्या श्वासापर्यंत मी समाजसेवेचे काम सुरू ठेवणार आहे. आशिर्वादावर अवलंबून न राहता प्रत्येकाने काम केले पाहिजे. किर्ती सहसा मिळत नाही. समाजसेवेचे काम हे कधीही पूर्ण होणार नाही. या कार्यासाठी आणखी आयुष्य मिळावे असे वाटते. सतकिर्ती वाढवावी, अपकिर्ती थांबवावी. किर्ती वाढवण्यासाठी मेहनत करावी लागेल. पुरस्काराचे मिळालेले २५ लाख रुपयांचे मानधन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देते असल्याचे यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जाहीर केले.
(हेही वाचा – महाराष्ट्र भूषण सोहळा २०२२ : आप्पासाहेब मन स्वच्छ करतात – सुधीर मुनगंटीवार)
Join Our WhatsApp Community