महाराष्ट्राला उर्जाक्षेत्रासाठी ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच पुरस्कार’ प्रदान

181

ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्राला ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स-स्कॉच अवार्ड इन पावर अँड एनर्जी’ प्रदान करण्यात आला. राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्कॉच ग्रुपच्यावतीने शनिवारी येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या सिल्वर ओक सभागृहात आयोजित कार्यक्रमात शासन,अर्थ, बॅंकिंग, तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे महाराष्ट्र शासनाचा ऊर्जा विभाग ‘इंडिया गव्हर्नन्स फोरम’ च्या ‘स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट’ 2021 मध्ये देशात प्रथम स्थानावर राहिला. या उपलब्धीसाठी राज्याच्या ऊर्जा विभागालाही यावेळी पुरस्काराने गौरविण्यात आले. स्कॉच ग्रुपचे अध्यक्ष समीर कोचर यांच्या हस्ते प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या महापारेषण कंपनीचे सल्लागार श्याम प्रसाद, सुत्रधारी कंपनीचे निवासी कार्यकारी संचालक प्रफुल्ल पाठक यावेळी उपस्थित होते.

रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवा पर्याय

राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या महापारेषण कंपनीने ड्रोनचा वापर करून दुर्गम भागातील अति उच्च दाब वाहिन्यांचे सर्वेक्षण व देखरेख केली. मुंबई उपनगर व शहरी भागातील महत्त्वाच्या पारेषण वाहिन्यांच्या जुन्या तारा बदलून नवीन एचटीएलएस कंडक्टरचा उपयोग करून वाहिन्यांच्या क्षमतेत वाढ केली.मोनोपोल मनोऱ्यांचा वापर सुरू केला परिणामी, वहिवाट मार्गाची समस्या कमी करण्यात व रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला.

इतक्या घरांमध्ये वीजजोडणी

‘एचव्हीडीसी  योजने’अंतर्गत एकूण 1 लाख 29 हजार 546 कृषीपंप ऊर्जान्वित झाले. ‘मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजने’अंतर्गत एकूण 99 हजार 744 कृषीपंप बसविण्यात आले.24 एप्रिल 2021 पासून सुरू झालेल्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त घटकांसाठी सुमारे 12 हजार 102 घरगुती वीजजोडणी देण्यात आली.

कोरोना काळात राज्यातील जनतेला अखंडित व विक्रमी वीजपुरवठा झाला. सुयोग्य नियोजन केल्यामुळे तौक्ते,निसर्ग चक्रीवादळ, पूरपरिस्थितीतही विद्युतपुरवठा सुरळीत ठेवला. या सर्व बाबींच्याआधारे महाराष्ट्राने ‘स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट’ 2021 मध्ये देशात प्रथम स्थान मिळविले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.