Citi-Axis Bank: आता अ‍ॅक्सिस बँकेच्या हाती सिटी बँकची कमान

140

सिटी बँकेचा ग्राहक व्यवसाय बुधवारपासून पूर्णपणे अ‍ॅक्सिस बँकेच्या नियंत्रणाखाली आली आहे. सिटी बँकेचा ग्राहक व्यवसाय अ‍ॅक्सिसने पूर्णपणे ताब्यात घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून ही अधिग्रहण प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे आता सिटी बँकेच्या विलिनीकरणाचा थेट परिणाम भारतातील सिटी बँकेच्या ग्राहकांवर होणार आहे.

क्रेडिट कार्ड, गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज, किरकोळ बँकिंग आणि विमा वितरणासह अनेक व्यवसाय सिटी बँकेच्या ग्राहक व्यवसायाचा भाग आहेत. सिटी ग्रुपने आपला जागतिक व्यवसाय बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी २०२१ मध्ये याची घोषणा केली होती. या अंतर्गत १३ देशांमधील रिटेल बँकिंग ऑपरेशन्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये भारताचाही समावेश आहे.

अ‍ॅक्सिस आणि सिटी बँक यांच्यात गेल्या वर्षी मार्चमध्ये करार झाला होता. अ‍ॅक्सिस बँकेने गेल्या वर्षी सांगितले की, त्यांनी सिटी बँकेचा भारतातील ग्राहक व्यवसाय १२ हजार ३२५ कोटी रुपयांमध्ये विकत घेण्यासाठी करार केला आहे. सिटी बँकेच्या ग्राहक व्यवसायात कर्ज, क्रेडिट कार्ड, संपत्ती व्यवस्थापन आणि रिटेल बँकिंग ऑपरेशन्स समाविष्ट आहेत. बँकेच्या क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओमध्ये श्रीमंत ग्राहकांचा समावेश आहे. बँकेला अधिग्रहण पूर्ण करण्यासाठी १२ महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये अ‍ॅक्सिस बँकेला यासाठी भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) मंजुरी मिळाली होती.

या करारानंतर अ‍ॅक्सिसचा पोर्टफोलिओ पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. अ‍ॅक्सिसच्या खात्यात २५ लाख ग्राहक जोडले जातील. सिटी बँकेचा क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओ, ५० हजार २०० कोटी रुपयांच्या ठेवी अ‍ॅक्सिसकडे जातील. सिटी बँकेची भारतातील सात कार्यालये, २१ शाखा आणि ४९९ एटीएमचे नेटवर्क देखील अ‍ॅक्सिसकडे जाईल. सिटी बँकेची २५ लाख कार्ड अ‍ॅक्सिस बँकेकडे जातील आणि यामुळे कार्ड पोर्टफोलिओचा ताळेबंद ५७ टक्के वाढेल. अ‍ॅक्सिस बँक देशातील मोठ्या ३ कार्ड व्यवसाय पुरवठादारांपैकी एक बनेल. सिटी बँकेचे क्रेडिट कार्ड, रिटेल बँकिंग, संपत्ती व्यवस्थापन आणि ग्राहक कर्ज विभाग अ‍ॅक्सिस बँकेचा असणार आहे. अ‍ॅक्सिस बँकेला या करारानंतर २.५ कोटींहून अधिक बचत खाती, २० लाखांहून अधिक पगार खाती मिळणार आहेत. दोन्ही बँकांच्या करारानंतर क्रेडिट कार्डधारकांच्या संख्येत अ‍ॅक्सिस बँक आयसीआयसीआय बँकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर असेल.

(हेही वाचा – Bank Holidays in March 2023: मार्च महिन्यात १२ दिवस बँका राहणार बंद)

भारतातील सिटी बँकेच्या संपूर्ण कामाची जबाबदारी आजपासून ऍक्सिसकडे असेल. सिटी बँकेचे लाखो ग्राहक डेबिट, क्रेडिट आणि बचत खाती अ‍ॅक्सिस बँकेकडे जातील. आपण कार्ड व्यवहारांबद्दल बोललो तर सिटी बँक अव्वल आहे. आरबीआयच्या अहवालानुसार, सिटी बँकेचे भारतात जवळपास २५ लाख क्रेडिट कार्ड आहेत, जे एका महिन्यात ३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करतात. सिटी बँकेच्या डेबिट कार्डची संख्या १४ लाखांच्या पुढे गेली आहे. तर कर्ज खात्यांची संख्या १२ लाख आहे. आजपासून सिटी ग्राहकांना अ‍ॅक्सिस बँकेच्या सेवा आणि ऑफरचा लाभ मिळणे सुरू होईल. विलिनीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान काही काळ ग्राहकांना अडचणी येऊ शकतात, मात्र ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नसल्याचा दावा दोन्ही बँकांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.