Ayodhya Ram Mandir : श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला ५५ देशांतील १०० नेते येणार; महाराष्ट्रातील १६८ जण आमंत्रित; रणजित सावरकरांनाही निमंत्रण 

श्रीराममंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून ९७ साधुसंतांसह १६८ जणांना निमंत्रित करण्यात आले आहे.

263

भारतासह जगभरातील हिंदूंसाठी उत्साह आणि भक्तीभाव वाढवणाऱ्या अयोध्येतील श्रीराममंदिरामध्ये (Ayodhya Ram Mandir) रामलला विराजमान होणार आहेत. २२ जानेवारी रोजी होणारा हा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी जगभरातील ५५ देशांतील १०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. देशभरातून ७ हजार विशेष निमंत्रित आहेत, तर महाराष्ट्रातून ९७ साधुसंतांसह १६८ जणांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. रणजित सावरकर या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

(हेही वाचा Ayodhya : अयोध्येत उभारणार जगातील पहिले संपूर्ण शाकाहारी सप्त तारांकित हॉटेल)

सोहळ्यासाठी कोण आहेत आमंत्रित?

अयोध्येतील श्रीराममंदिरामधील (Ayodhya Ram Mandir) या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना खास क्यूआर कोड असलेली हायटेक निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आली आहे. या निमंत्रितांमध्ये वारकरी संप्रदायातील ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर, वैष्णव पंथातील महामंडलेश्वर १०८ श्री विश्वेश्वरानंद, संन्यास आश्रमाचे काशिकानंद महाराज, मोहनानंद महाराज, नाणीज पीठाचे नरेंद्र महाराज, गोव्याचे ब्रह्मानंद महाराज, महानुभाव पंथाचे योगेश्वर महाराज यांच्यासह अनेक मोठ्या साधुसंतांचा समावेश आहे. तर सामाजिक क्षेत्रातून मोजक्याच मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांचा समावेश आहे. तसेच गिरीश प्रभुणे, भटके विमुक्त जमातीचे नेते दादा इदाते यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. उद्योग क्षेत्रातून रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी, अनिल अंबानी, कल्याण ज्वेलर्सचे टी.एस. कल्याणरमन आदी दिग्गज मंडळींनाही या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.