- ऋजुता लुकतुके
उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरी (Ayodhya Ram Mandir Consecration) येत्या दिवसांमध्ये अध्यात्मिक पर्यटन केंद्र बनेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच व्यक्त केला होता. आता मनुष्यबळ विकास क्षेत्रात सेवा देणाऱ्या कंपन्यांनीही अयोध्या नगरीत येत्या २-३ वर्षांत २२ टक्के नोकऱ्या वाढतील असा अंदाज व्यक्त केला आहे. सुरुवातीचं काम हे पायाभूत सुविधा उभारणी आणि बांधकाम क्षेत्रात होणार आहे. त्यामुळे सिव्हिल इंजिनिअर असलेल्या लोकांना नोकरीची चांगली संधी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी २२ जानेवारीला राम मंदिर लोकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. सीआयईएल या मनुष्यबळ विकास कंपनीने एमईपी (मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक व प्लंबिंग) क्षेत्रात नोकऱ्या वाढतील असा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच व्यवस्थापन, साईट इंजिनिअरिंग, साईट सुपरवायजर्स आणि कामं पार पाडणारे एक्झिकिटिव्ह यांनाही मोठी मागणी असेल.
(हेही वाचा – Ramesh Bais : राज्यपालांच्या हस्ते राजभवन परिसरात श्रीराम पंचायतन मूर्तींची स्थापना)
‘मंदिर भाविकांना खुलं झाल्यानंतर इथं लोकांचा ओघ वाढेल. आणि त्यामुळे येत्या २-३ वर्षांमध्ये इथं संग्रहालय, आर्ट गॅलरी, ऐतिहासिक वारसा असलेल्या जागांचं जतन व कला सादर करण्यासाठी सभागृह अशा जागांचा विकास हळूहळू इथं सुरू होईल. त्यामुळे अर्थातच वास्तूविशारद, वास्तू अभियंते, पासून ते अगदी कामगारांपर्यंत सगळ्यांना नोकऱ्या मिळण्याचं प्रमाण २२ टक्यांनी वाढेल,’ असं सीआयईएल एचआर या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नायर यांनी मीडियशी बोलताना सांगितलं.
एरवी अयोध्या नगरी हे उत्तर प्रदेशातील एक छोटसं गाव आहे. त्याची लोकसंख्या ८०,००० आहे. आणि क्षेत्रफळ १२० वर्ग किलोमीटर आहे. पण, राम मंदिराच्या उद्घाटनामुळे या शहराबद्दल फक्त भारतातच नाही तर जगभरात कुतूहल निर्माण झालं आहे. सोहळ्यालाही परदेशी पर्यटकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे निदान पहिली काही वर्षं इथं आध्यात्मिक पर्यटकांचा ओढा असणार आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राबरोबरच इथं पर्यटन क्षेत्राचाही विकास अपेक्षित आहे. पर्यटन, निवास, भोजन अशा सगळीकडे कुशल कामगारांची गरज शहराला पडणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community