सध्या देशभरात भक्तिमय वातावरण आहे. अवघा देश प्रभु श्रीरामाच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. अयोध्येत सोमवारी, २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात (Ayodhya Shri Ram Mandir) रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सर्वत्र सुरू आहे. यानिमित्त मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. त्यानुसार दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक विद्यूत रोषणाईने उजळून निघाले आहे. स्मारकातही ‘राम उत्सव’ साजरा करण्यात येत आहे.
‘आमंत्रण प्रभु रघूत्तम सोडितां हे दिव्यार्थ, देव! अमुचें कुल सज्ज आहे.’ , असे वचन लिहिलेली भव्य कमान स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या प्रवेशद्वारी उभारण्यात आली आहे. या कमानीवर दोन्ही बाजूंना प्रभु श्रीरामांचे धनुष्यबाण हातात घेतलेले भव्य चित्र आहे. त्यावर ‘||श्रीरामो विजयते ||’ असे लिहिले आहे तसेच स्मारकाचे पेटलेल्या मशालीचे स्मृतिचिन्हही आहे. भावभक्तिमय अशा या सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित बोधवचने !
प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या श्रीरामाच्या भव्य प्रतिमेच्या कमानीवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार लिहिण्यात आले आहेत. आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रभु श्रीरामाविषयी व्यक्त केलेले विचार यानिमित्ताने सर्वांचे लक्ष केंद्रित करून घेत आहेत. ‘रावणाचा निहन्ता श्रीराम’ जोपर्यंत हिंदुस्थानात आहे, तोपर्यंत हिंदुस्थानाची उन्नती सहजलब्ध राहणारी आहे. श्रीरामाचा विसर पडला की, हिंदुस्थानातील ‘राम’ नाहीसा होईल.’ अशा प्रकारे प्रभु श्रीरामाचा राष्ट्ररक्षणाशी असलेला संबंध दर्शवणारी स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित बोधवचने हे या कमानीचे वैशिष्ट्य आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community