Ayurveda : समज-गैरसमज

225
Ayurveda : समज-गैरसमज
Ayurveda : समज-गैरसमज
  • वैद्य परीक्षित शेवडे

आयुर्वेदाला कोंडीत पकडण्याकरता हमखास विचारला जाणारा एक प्रश्न: एखाद्याला साप चावला, कोणाला हृदयविकाराचा झटका आला, कोणाला पॅरालिसिसचा झटका आला, अपघात झाला तर अशा वेळी आपण रुग्णवाहिका, हॉस्पिटलमधली धावपळ, आयसीयू, बाहेरुन रक्त चढवणे अशा गोष्टी नेहमी पाहतो. अशा ठिकाणी आयुर्वेद (Ayurveda) कुठे काम करतो? तुम्हाला स्वतःला गरज पडली, तर अशा स्थितीत हॉस्पिटलमध्ये जाणार नाही का?

(हेही वाचा – Kalyan Dombivli मधील ६५ बेकायदेशीर बिल्डिंगचं प्रकरण तापलं; नेमकं काय कारण? वाचा)

उत्तर :

आयुर्वेद (Ayurveda) विरोधकांकडून विचारला जाणारा हा मूळ प्रश्नच अत्यंत तर्कदुष्ट आहे. तो का आणि कसा, हे स्पष्ट करण्यापूर्वी त्यातील अवस्थांचा थोडा सखोल विचार करावा लागेल.

स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकमागील दोन प्रमुख कारणं ही आभ्यन्तर रक्तस्राव होणे वा रक्तप्रवाह अडणे ही असतात. हृदयाबाबत दुसरे कारण अधिक महत्त्वाचे. इथे हृदयापर्यंत जाणाऱ्या रक्तवाहिन्या वा हृदयाला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह का अडतो? तर कोलेस्टेरॉलच्या (Cholesterol) किंवा सामान्य भाषेत मेदाच्या गुठळ्यामुळे. ही स्थिती निर्माण होऊच नये; म्हणून प्रयत्न करणं हे सर्वाधिक योग्य असल्याचं कोणीही टॉपचा कार्डिओलॉजिस्ट आपल्याला सांगेल. याकरता हात कोण देतं? तर आयुर्वेदोक्त दिनचर्या ! सोपी उदाहरणं देतो. नियमित व्यायाम, व्यसन नसणे, जेवल्यावर अंघोळ न करणे, मल-मूत्रादि वेग न अडवणे हे आणि बरंच काही आयुर्वेद (Ayurveda) सविस्तरपणे सांगतो. त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणं वा त्याला थेट कालबाह्य वगैरे ठरवणं हे आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन आहे. स्ट्रोकबाबत मेंदूत रक्तस्रावाच्या अनेक घटना हे पोटातून रक्त पातळ करण्याची औषधं दिल्याने होतात. हृदयाला वाचवण्यासाठी दिलेली औषधं मेंदूत गडबड करू शकतात. ही बाबदेखील सोयीस्करपणे विसरली जात आहे का? बरं तेही बाजूला ठेवूया.

(हेही वाचा – Samosa Recipe : अगदी सोप्या पद्धतीने समोसा कसा बनवायचा माहित आहे का?)

वैद्यकीय क्षेत्रात काही अवस्था ओपीडीला पाहायच्या असतात, तर काही आयपीडी म्हणजे हॉस्पिटलमध्ये. वरीलपैकी कोणताही रुग्ण आयुर्वेदाच्याच कशाला. अलोपॅथीच्या पदवीधराच्या दवाखान्यात नेलात, तरी तो अॅडमिट करण्याचाच सल्ला देणार आहे. स्ट्रोकबाबत रक्ताची गुठळी फोडण्याची औषधे असोत वा हार्टबाबत शस्त्रक्रिया; या दोन्ही गोष्टी दवाखान्यात करण्याच्या नव्हेत. रक्तातील गुठळी विरघळवणे वा रक्त पातळ ठेवण्याचे उत्तम पर्याय आयुर्वेदाकडे आहेत, हे कोविडच्या निमित्ताने आम्ही वैद्यांनी अनुभवले. संबंधित रिपोर्ट्सही जनतेसमोर ठेवले. तरी इथे विचार करता घर ते रुग्णालय या प्रवासात तो रुग्ण सुखरूप रहावा; म्हणून आयुर्वेद (Ayurveda) मदत करतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यातही दुर्दैवाने एखाद्याची वेळच आली असेल, तर आयुर्वेद काय अलोपॅथी काय… ईश्वरेच्छा बलीयसी । दुसरीकडे रक्तवाहिन्यांतली ब्लॉकेज ठराविक मर्यादेपर्यंत असल्यास ती काढून टाकता येतील अशीही आयुर्वेदीय औषधे आहेत. याबाबतचा आमचा केस स्टडी हा जर्नलमध्ये सबमिट केलेला आहे. यासाठी रुग्णाची मानसिक तयारी तितकीच महत्त्वाची.

हॉस्पिटलमधून वरील उल्लेखलेल्या क्रिया वा अन्य काही बाबी होऊन रुग्ण घरी परतल्यावर पहिला आधार जीवनशैली सुधारण्यासाठी आणि आता सजगता वाढल्याने उपचार म्हणूनही आयुर्वेदाचा आसरा घेतो.

आता प्रश्न तर्कदुष्ट का म्हटला ते सांगतो; कारण हे रुग्ण कोणत्याच pathyच्या ओपीडीमध्ये न जाता थेट रुग्णालयातच जायला हवेत. ‘तुम्ही कुठे जाल?’ हा प्रश्नच बाद आहे. आता या प्रश्नाचं उत्तर आल्यावर आयुर्वेद वा अलोपॅथी यांत कोण श्रेष्ठ वा कनिष्ठ हे कोणी ठरवू पाहत असेल, तर त्याच न्यायाने त्या रामदेवबाबांनी जेव्हा यादीच देऊन “या साऱ्या रोगांवर अलोपथीमध्ये इलाज आहे का?” असं विचारलं होतं तेव्हा आक्षेप घेणाऱ्यांनी उत्तरं द्यायला हवी होती ना ?

“रुग्णाच्या आरोग्यात मी माझ्या परीने काय भर घालू शकतो?”, हाच विचार प्राधान्याने करत त्याचं भलं करून देणं हे कुठल्याही वैद्यकशास्त्राच्या चिकित्सकाचं अंतिम ध्येय असावं. श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा वादच व्यर्थ आहे. ‘कुठे आणि काय’ हीच गुरुकिल्ली. त्यातही ज्या विषयातली मुळाक्षरेदेखील आपल्याला ठाऊक नाहीत, त्यावर अधिकार वाणीने बोलून दिशाभूल करणं हे सामाजिक आरोग्याला धोका पोहचवणारं आहे. काम करा, समोर ठेवा, तुमच्याकडची कोणती गोष्ट उपयुक्त आहे याबाबत प्रबोधन करा… लोकांना त्यांचा त्यांचा निर्णय घेऊ द्या! एरव्ही ‘निरोगी राहण्यासाठी वेळच्या वेळी झोपा’ इतकी साधी पण महत्त्वाची बाबही समाजमाध्यमांतून न सांगणारे वैद्यक जिहादी इतर चिकित्साशास्त्रांवर हल्ला करण्यात मात्र आघाडीवर असतात आणि असले बाष्कळ मुद्दे उपस्थित करतात हे बघून त्यांना त्यांच्या पेशाचं महत्त्व कितपत कळलं आहे; हा प्रश्न सतावतो! बरं स्वतः वैद्यकीय पेशात नसूनही आयुर्वेदावर टीका करत बसणाऱ्या महाभागांबद्दल तर काय बोलावं? ते अर्धवट डॉक्टर असतात!!

( लेखक आयुर्वेद वाचस्पति आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.