सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्यांसाठी ‘आयुष-६४’चे वरदान!

एकापेक्षा अधिक वनौषधींचा वापर करुन तयार केलेले हे औषध लक्षणे नसलेल्या, सौम्य आणि मध्यम स्वरुपाच्या कोविडबाधित रुग्णांची प्राथमिक काळजी घेण्यात साहाय्यक आहे.

76

कोविडच्या दुसऱ्या लाटेचा संपूर्ण देशभरात उद्रेक झाला असतानाच, आयुष-64 हे सौम्य व मध्यम स्वरुपाच्या कोविडबाधित रुग्णांसाठी आशेचा किरण घेऊन आले आहे. आयुष मंत्रालयांतर्गत कार्यरत असणा-या केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद(सीसीआरएएस)ने आयुष-64 हे औषध विकसित केले आहे. एकापेक्षा अधिक वनौषधींचा वापर करुन तयार केलेले हे औषध लक्षणे नसलेल्या, सौम्य आणि मध्यम स्वरुपाच्या कोविडबाधित रुग्णांची प्राथमिक काळजी घेण्यात साहाय्यक असल्याचे देशातील नामांकित संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. सुरुवातीला हे औषध मलेरियासाठी 1980 साली विकसित केले होते आणि आता पुन्हा कोविडसाठी याचा वापर करण्यात आला आहे.

तीन केंद्रांवर चाचणी

आयुष मंत्रालय आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद(सीएसआयआर)च्या सहकार्याने सौम्य ते मध्यम स्वरुपाच्या कोविडबाधित रुग्णांच्या व्यवस्थापनात आयुष-64च्या सुरक्षा आणि कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी एक मल्टी सेंटर क्लिनिकल चाचणी नुकतीच करण्यात आली. आयसीएमआरच्या कोविड-19 व्यवस्थापनावरील कृती दलाने देखील याची तपासणी केली आहे. पुणे येथील संधिवात रोग केंद्राचे संचालक आणि आयुष मंत्रालय-सीएसआयआरचे मानद मुख्य क्लिनिकल समन्वयक डॉ.अरविंद चोपडा यांनी तीन केंद्रांवर ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती दिली. केजीएमयू(लखनऊ), डीएमआयएमएस (वर्धा) आणि बीएमसी कोविड केंद्र, मुंबई येथे घेण्यात आलेल्या चाचणीत प्रत्येकी 70 सहभागींचा समावेश होता.

(हेही वाचाः आधार कार्ड नसलेल्यांच्या लसीकरणाचे काय? मुंबई उच्च न्यायालयाकडून विचारणा )

लक्षणे नसलेल्या रुग्णांना लाभदायक

आयुष-64 चे परिणाम अत्यंत चांगले असून सद्यस्थितीत गरजू रुग्णांना आयुष-64चा लाभ मिळाला पाहिजे, असे आयुषचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक आणि आंतर-शिस्त आयुष संशोधन व विकास कृती दलाचे अध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी सांगितले. समितीने आयुष-64च्या निकालाचा काळजीपूर्वक आढावा घेतला असून लक्षणे नसलेल्या, सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या कोविडबाधित रुग्णाच्या व्यवस्थापनात आयुष-64 चा उपयोग करण्याची शिफारस केली आहे, अशी माहिती एमसीचे अध्यक्ष डॉ. व्ही. एम. कटोच यांनी दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.