डॉकयार्ड रोड येथील दुघर्टनाग्रस्त बाबू गेनू मंडई व महापालिका शाळेच्या जागी नवीन इमारत बांधणीच्या कामाला प्रत्यक्षात जानेवारी २०१९ मध्ये सुरुवात झाली आहे. हे बांधकाम जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात जुलै २०२३ पर्यंत या इमारतीचा केवळ ढाचा तयार झाला असून उर्वरीत कोणतेही काम झालेले नाही. त्यामुळे आजही या मंडई, शाळा तसेच महापालिका कर्मचारी वसाहत असलेल्या या इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नाही, उलट या बांधकामाचा खर्च तब्बल १४ कोटींनी वाढल्याचे पहायला मिळत आहे.
डॉकयार्ड रोड येथील बाबू गेनू मंडईच्या दुघर्टनेमध्ये ६१ जणांचे बळी गेले होते. त्यानंतर या जागी इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले. त्यानुसार निविदा मागवून कंत्राटदाराची नेमणूक करत महापालिका मंडई व शालेय इमारतीचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. मार्च २०२३ या कामांसाठी प्राईम सिव्हील इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निवड करण्यात आली होती. त्यानंतर या इमारतीचे भूमिपुजन सप्टेंबर २०१९ मध्ये तत्कालिन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते झाला होता. या कामांसाठी विविध करांसह ३७ कोटी ९३ लाख रुपये खर्च केले जाणार होते. परंतु आता या इमारतीचे विविध प्रकारची सिव्हीलची तसेचे विद्युत कामे प्रगतीपथावर आहेत. मात्र बांधकामाचा ढाचा जवळपास पूर्ण झाला असला तरी उर्वरीत कामे शिल्लक आहेत.
मात्र, जुलै २०२३ पर्यंत या इमारतीचे बांधकाम अपूर्ण असतानाच आता या इमारतीचा खर्च विविध करांसह १३.७३ कोटींनी वाढला आहे. या वाढीव खर्चासह १५ महिन्यांचा अवधी वाढवून दिल्यामुळे आता हा कालावधी ३६ महिन्यांचा झाला आहे. त्यामुळे या कामांचा भूमिपुजनापासून हा कालावधी गृहीत धरला सप्टेंबर २०२२ मध्येच हे बांधकाम पूर्ण व्हायला हवे. परंतु आता ३६ महिन्यांचा कालावधी उलटून अधिक दहा महिने अधिक झाले आहे. त्यामुळे या प्रकल्प कामाला जेवढा विलंब होत आहे, तेवढा वाढीव खर्चही होत आहे.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : उपकरप्राप्त इमारतींप्रमाणे म्हाडा इमारतींचा पुनर्विकास; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा)
त्यामुळे या इमारतीच्या परिघाभोवती आवार भिंतीसह मोठी संरक्षक भिंत, बेस्ट इलेक्ट्रीक सब स्टेशन, तळघरापर्यंत आरसीसी रॅम्प, पदपथाची कामे, इमारतीची मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉक, लिफ्ट मशीन रुम, ड्रेनेज सिस्टीम, बाजार भागातील भिंतीवर लादीचे काम, खिडक्यांवर जाळ्या, पाचव्या मजल्यावरील हॉलमध्ये फॉलसिलिंगची कामे, पाण्याची टाकी, विविध रंगरंगोटी आदींसाठी हा सुमारे १३ कोटींचा खर्च वाढल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु ज्या वाढीव खर्चांमध्ये जी वाढीव कामे दर्शवली आहे, ती कामे या इमारतीचा बांधकाम आराखडा बनवताना प्रस्तावित नव्हता का असा प्रश्न उपस्थित होतो. आणि जर तो नसेल तर सल्लागाराने कशाच्या आधारावर हा आराखडा बनवला आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community