बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याने पोलिसांकडील पिस्तुल हिसकावून घेतली आणि त्याने बाजूला बसलेल्या पोलिसांच्या पायावर गोळी झाडली होती, त्यानंतर आणखी दोन फायर केल्या, त्याच्याकडे पिस्तुल होती आणि तो कशीही फायरिंग करू शकतो, म्हणून पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर गोळीबार केला, त्यात अक्षय गंभीर जखमी झाला होता.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूर येथील एका खाजगी शाळेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) हा न्यायालयीन कोठडीत नवी मुंबईतील तळोजा येथील तुरुंगात होता. दरम्यान दुसऱ्या एका गुन्ह्यात ठाणे गुन्हे शाखेने अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी ५ वाजता तळोजा कारागृहातून ताबा घेतला होता. ठाणे गुन्हे शाखा त्याला नवी मुंबई येथून ठाण्यात घेऊन जात असताना अक्षय शिंदे याने पोलीस व्हॅनमध्येच एका पोलीस अधिकाऱ्याच्या कमरेला असलेली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचून पोलिसांवर दोन राऊंड फायर केली, त्यानंतर आणखी फायरिंग करु शकतो, म्हणून पोलिसांनी तातडीने स्वत:च्या संरक्षणासाठी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या, त्यात त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.
या गोळीबारात एक पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्य रुग्णालयात आणण्यात आले, असता डॉक्टरांनी आरोपी अक्षय शिंदेला तपासून मृत घोषित केले आणि जखमी पोलीस अधिकाऱ्याला उपचारासाठी दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
Join Our WhatsApp Community