बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडल्याने पालक रस्त्यावर उतरले. प्रथम शाळेबाहेर आंदोलन केल्यानंतर संतप्त आंदोलकांनी रेल्वे रुळांवर उतरून तब्बल ९ तास रेल्वे वाहतूक ठप्प केली. रेल्वे रुळांवर जमाव आक्रमक झाल्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक झाल्याच्या घटनाही घडल्या. या दगडफेकीत रेल्वे पोलीस आयुक्त रविंद्र शिसवेंसह 10 पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. (Badlapur School Case)
(हेही वाचा – Badlapur School Case : रेल्वेबाहेरील प्रश्नासाठी बदलापुरात रेल रोको; रेल्वे सेवेवर कसा झाला परिणाम?)
आता बदलापुरात आंदोलन चिघळवणाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु करण्यात आली आहे. माध्यमे आणि पोलिसांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बदलापूर येथील शाळेत दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. हा खटला जलदगतीने चालवला जाईल आणि त्यासाठी विशेष सरकारी वकील नेमावा, असेही शिंदे म्हणाले.
चौकशी महिला आयपीएस अधिकारी करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींसोबत झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेची एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकारने तपास करण्यासाठी महानिरीक्षक दर्जाच्या भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी आरती सिंह यांची नियुक्ती केली आहे. या घटनेची लवकरात लवकर चौकशी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्हाला या प्रकरणात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करायचे आहे आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीसाठी न्यायचा आहे.
या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Badlapur School Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community