कोरोना या जागतिक महामारीमुळे सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या सर्व धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी आणण्यात आली आहे. त्यानुसार राज्य सरकारने २१ जुलै रोजी बकरी ईदच्या निमित्ताने गृह विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार ईदच्या दिवशी जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावी. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी, अशी सूचना सरकारने केली.
(हेही वाचा : खासदार गोपाळ शेट्टींची वेबसाईट पाकड्यांकडून हॅक!)
नमाज घरीच अदा करण्याची सूचना!
राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता, नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी. लागू करण्यात आलेले ‘ब्रेक दि चैन’ चे निर्बंध तसेच त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही. बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये किंवा एकत्र जमू नये. कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलिस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक असेल असेही गृह विभागाने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community