हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना : अबतक १०७

164

मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ उपक्रमातील लाभार्थी संख्येने ३ फेब्रुवारी २०२३ रोजी ३ लाखांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर बुधवारी म्हणजे २२ फेब्रुवारी २०२३ रात्रीपर्यंत अवघ्या १९ दिवसांच्या कालावधीत आणखी एक लाख लाभार्थ्यांची यामध्ये भर पडली आहे. आपला दवाखान्यांच्या लाभार्थ्यांची संख्या आता ४ लाख ०५ हजार ४२६ इतकी झाली आहे. मुंबईत सुरू केलेल्या या दवाखान्यांची संख्या १०७ वर पोहोचली आहे.

( हेही वाचा : कोकण रेल्वे मार्गावर आणखी दोन गाड्या धावणार विद्युत वेगाने! )

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १७ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेचे लोकार्पण करण्यात आले होते. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार व उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचा सातत्याने विस्तार करण्यात येत असून सध्या १०७ ठिकाणी आपला दवाखाने कार्यरत आहेत.

ही योजना सुरु झाल्यानंतर प्रारंभी १ लाख लाभार्थी संख्या दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ रोजी पूर्ण झाली होती. त्यानंतर १ महिना ७ दिवसांनी म्हणजे दिनांक ७ जानेवारी २०२३ रोजी २ लाख लाभार्थी टप्पा गाठण्यात आला. तर त्यापुढे २६ दिवसांनी म्हणजे दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी ३ लाखांच्या पार लाभार्थ्यांची संख्या पोहोचली. आता त्याहीपुढे जात अवघ्या १९ दिवसांत ४ लाख लाभार्थ्यांचा टप्पा पार झाला आहे.

आपला दवाखान्यांमधून ३ लाख ८९ हजार ८३३ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार यांचा लाभ घेतला आहे. तर, पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र येथे १५ हजार ५९३ रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा उपचार सुविधांचा लाभ घेतला आहे.

जी उत्तर विभागामध्ये धारावीसारख्या झोपडपट्टी भागातील गरज लक्षात घेता अधिकाधिक नागरिकांना कोविड पश्चात कालावधीमध्ये देखील आरोग्य सेवा मिळाली पाहिजे, अशा सूचना विद्यमान सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार महानगरपालिकेने दवाखाने सुरु केले आणि त्याठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह १४७ प्रकारच्या रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या व्यतिरिक्त क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांकरिता पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्रांद्वारे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचबरोबर विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील पॉली क्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या दवाखान्यांमधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारित पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशिल नोंदविण्यात येत आहे. यामुळे आपल्या दवाखान्यांचे कामकाज हे विनाकागद अर्थात पेपरलेस पद्धतीने व पर्यायाने पर्यावरणपूरक होत आहे, अशी माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.