विशेष प्रतिनिधी : सचिन धानजी
मुंबई महापालिकेच्या दवाखान्यांसह आरोग्य केंद्र आणि विशेष रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आपली चिकित्साअंतर्गत चाचण्यांची सुविधा पुरवण्यासाठी नव्याने नेमलेल्या क्रस्ना डायग्नोस्टीक सेंटरला आता शेवटची संधी देण्यात आली आहे. या संस्थेच्या विरोधात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतरही त्यांच्या कामांमध्ये सुधारणा झाल्या नसून अहवाल चुकीचे बनवणे अशाप्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे या संस्थेसाठी ही शेवटची संधी असून प्रशासनानेही आता अंतिम निर्णय घेत या संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु केल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा : पैसे न भरता मिळाले फ्री ट्विटर सब्सक्रिप्शन! नेमके सुरू काय? नेटकरीही गोंधळले )
मुंबई महापालिकेची रुग्णालये, दवाखाने, प्रसुतीगृह आदी ठिकाणी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे चिकित्साअंतर्गत खासगी प्रयोग शाळांच्या माध्यमातून चिकित्सा सुविधा सुरु करण्यासाठी महापालिकेने प्रयोगशाळांकडून अर्ज मागवले होते. महापालिकेच्या माध्यमातून आपली चिकित्साअंतर्गत मुलभूत तसेच विशेष तथा प्रगत रक्त चाचण्यांकरता नेमण्यात आलेल्या संस्थांचा कालावधी ३१ जानेवारी २०२३ रोजी संपुष्टात येत असल्याने महापालिकेने निविदा मागवली होती. नोव्हेंबर महिन्यामध्ये मागवलेल्या या निविदेमध्ये क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे तिन्ही विभागांसाठी ही संस्थेची निवड करण्यात आली आहे. या संस्थेने मुलभूत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना ८६ रुपये व विशेष तथा प्रगत चाचण्यांकरता प्रति रक्त नमुना करता ३४४ रुपये एवढा दर आकारला आहे. त्यामुळे या संस्थेची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे यासाठी सुमारे २७ कोटी ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित मानला जात आहे.
नव्याने नेमलेल्या संस्थेने यापूर्वी देण्यात येणाऱ्या मुलभूत चाचण्यांच्या २२३ रुपयांच्या तुलनेत ८६ रुपये आणि विशेष तथा प्रगत रक्त चाचण्यांच्या प्रति चाचणीकरता ८९२ रुपयांच्या तुलनेत ३४४ रुपये देऊ केला. त्यामुळे या संस्थेला कार्यादेश देत त्यांची सेवा सुरु करण्यात आली. परंतु चाचण्यांचे अहवाल उशिराने देणे, निश्चित केलेल्या चाचण्या न करणे अशाप्रकारच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्याने या संस्थेला महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
या नोटीसनंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्यासह संबंधित वैद्यकीय अधिकारी संस्थेची बैठक बोलावली होती. परंतु या बैठकीला संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित राहिलेच नाही. त्यामुळे या संस्थेला समज देऊ कामांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु त्यानंतरही या संस्थेच्या माध्यमातून चुकीच्या पध्दतीने चाचण्यांचे अहवाल दिले जात असून यामुळे रुग्णांमध्येही भीतीचे वातावरण पसरु लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित संस्थेला आता शेवटची संधी दिली जात असून त्यानंतर या संस्थेला थेट काळ्या यादीत टाकले जावू शकते असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, निविदेमध्ये कमी बोली लावून लघुत्तम निविदाकार ठरल्याने त्यांना काम देणे क्रमप्राप्त होते. ही संस्था दिलेले काम पार पाडेल का याबाबत साशंकता असली तरी लघुत्तम निविदाकार असल्याने त्यांना काम द्यावे लागले. परंतु आता संस्थेच्या विरोधात प्राप्त होणाऱ्या तक्रारी आणि चाचण्यांचे अहवाल रुग्णांना आणि पर्यायाने डॉक्टरांना वेळेवर उपलब्ध होत नसल्याने तसेच ते अहवालात चुकीच्या नोंदी असल्याचे आढळून येत असल्याने एखाद्या लघुत्तम निविदाकारला काम दिल्यानंतर ज्याप्रमाणे काळ्या यादीत टाकले जात नाही, त्याप्रमाणे या संस्थेलाही सुधारणेची संधी दिली जात आहे. त्यामुळे आता संस्थेकडे शेवटची संधी असून जर त्यांच्या कामांमध्ये सुधारणा न झाल्याने महापालिकेच्या प्रचलित नियमानुसार संबंधित संस्थेवर कारवाई केली जाईल,असे त्यांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community