वांद्रे ते माहिम किल्ला सायकल ट्रॅकचा मार्ग मोकळा : सत्ता आल्यानंतर भाजपचा विरोध मावळला, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचीही चुप्पी

128

वांद्रे किल्ला ते माहिम किल्ल्यापर्यंत महापालिकेच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या बोर्डवॉक तसेच सायकल ट्रॅक बांधण्याचा तत्कालिन उपनगराचे पालकमंत्री यांच्या संकल्पनेतील या प्रस्तावाला भाजपने तीव्र विरोध केला होता. ३ हजार मीटर लांबीच्या या सायकल ट्रॅकसाठी दोनशे कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याने याला होणारा वाढता विरोध पाहता महापालिका प्रशासनाने महापालिकेची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी निविदा होऊनही हा प्रस्ताव ७ मार्चपूर्वी स्थायी समितीपुढे मंजुरीला आणला न आणता तो बाजुलाच ठेवला होता. त्यामुळे राज्यात नवीन शिंदे व फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर हा प्रस्ताव गुंडाळला जाईल,असे वाटत असतानाच त्यांच्याच काळात आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी हा प्रस्ताव मांडून प्रशासक म्हणूनही आपल्या अधिकारात परवानगी दिली. या प्रस्तावाबाबत भाजपसह समाजवादी पक्ष गप्प का असा सवाल उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : आंबेडकर मार्गावरील परळ-हिंदमाता दरम्यान पादचारी पूल : विद्यार्थी-पालकांसह चित्रपट रसिकांचा रस्ता ओलांडण्याचा मार्ग सुकर)

मुंबईतील माहिम ते प्रभादेवीतील श्री सिध्दी विनायक मंदिर या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्गाचे तसेच त्यावरील पदपथांचे नुतनीकरण वेगळ्याप्रकारे नुतनीकरण करण्यात येत असताना तत्कालिन पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिम किल्ला ते वांद्रे किल्ला हा मार्ग सायकल ट्रॅकने जोडण्याची संकल्पना मांडली. हा बोर्ड वॉक प्रकल्प राबवताना पर्यावरणपूरक साहित्याचा उपयोग करुन सायकल मार्गिका, पादचारी मार्गिका बांधली जाणार आहे. ३ किलोमीटर लांबीच्या आणि ५ मीटर रुंदीच्या या सायकल ट्रॅक व बोर्ड वॉक प्रकल्पात कोणताही अडथळा न ठरता याच्या बांधकामाचे नियोजन करून मागवण्यात आलेल्या या निविदेची प्रक्रिया राबवण्यात आली होती. ही निविदा ५ जानेावरी २०२२ रोजी उघडण्यात आली होती.

परंतु त्यानंतर पुढील पात्र निविदाकाराची निवड करून ७ मार्च २०२२ पूर्वी याबाबतचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक होते. परंतु स्थायी समितीला हा प्रस्ताव सादर केल्यास या प्रकल्पालाच यापूर्वी विरोध केलेल्या समाजवादी पक्ष आणि काँग्रेससह भाजपकडून जोरदार विरोध होऊ शकतो,त्यामुळे प्रशासनाने महापालिकेत हा प्रस्ताव सादर न करता तो राखून ठेवत प्रशासकाच्या कालावधीत मंजूर करण्याचा निर्णय घेतला. कोविडमुळे महापालिकेच्या तिजोरीवर पडलेला परिणाम आणि भविष्यातील आर्थिक समस्या लक्षात घेता या प्रकल्पाला भाजपसह सर्वच पक्षांनी विरोध केला होता. त्यामुळे हा प्रस्ताव बाजुला ठेवणाऱ्या प्रशासकांनी राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारकडून यापूर्वीच्या काही प्रस्तावांना हिरवा झेंडा मिळवण्यात यशस्वी झाल्यानंतर आता माहिम व वांद्रे किल्ल्याला जोडणाऱ्या सायकल ट्रॅकचाही प्रस्ताव पुढे रेटत मंजुर केला.

पुढील वर्ष भरात या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आलेल्या या प्रकल्पाचा कामासाठी युनिक कंस्ट्रक्शन- स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर या संयुक्त भागीदारीतील कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कामासाठी सुमारे २१८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.या सायकल ट्रॅकचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुढील दहा वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित संस्थेची असेल.

महापालिकेतील प्रशासक हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली काम करत असताना त्यांना आपल्याच विरोधानंतर नंतर या प्रस्तावाला देण्यात आलेल्या मंजुरीबाबत प्रशासकांना स्थगितीचे आदेश बजावता आले नाही. त्यामुळे हा प्रस्ताव जर यापूर्वी मंजूर झाला असता एव्हाना याचे काम सुरु होऊन नागरिकांना एक पर्यटन क्षेत्र निर्माण झाले असते. मुंबई भाजपकडून यावर टीका होत असली तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणी स्थगितीचे आदेश देता येत नसल्याने केवळ विरेाधासाठी विरोध केला जात असल्याचे पहायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.