जगातील टॉप-10 विमानतळात बंगळुरू आणि दिल्लीचा समावेश

वेळेत आणि दर्जेदार सेवा देणाऱ्या जगातील 10 विमानतळांमध्ये भारतातील बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आणि नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे. सिरीयम या विमानचालन विश्लेषक कंपनीच्या अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही विमानतळांवर जागतिक स्तराच्या विमान उड्डाणात 2022 मध्ये 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

( हेही वाचा : हिंगोलीत भूकंपाचे धक्के; ३.६ रिश्टर स्केल तीव्रता )

बंगळुरू व दिल्ली येथील ही दोन्ही विमानतळे 2021 मध्ये जागतिक टॉप-10 विमानतळांच्या यादीत नव्हती. परंतु सिरीयमच्या ‘ऑन-टाइम परफॉर्मन्स रिव्ह्यू 2022’ या अहवालानुसार, विमानांचे वेळेवर आगमन आणि निर्गमन यांबाबतीत बंगळुरूचे विमानतळ 2022 मध्ये जागतिक स्तरावर दुसरे सर्वोत्तम विमानतळ ठरले आहे. जपानचे हनेदा विमानतळ हे यामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे विमानतळ ठरले असून दिल्लीचे इंदिरा गांधी विमानतळ हे जागतिक स्तरावर सातव्या स्थानावर आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अकराव्या क्रमांकावर आहे.

बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे, याचे कारण हे विमानतळ 2021 मध्ये अव्वल 20 विमानतळांच्या यादीतही नव्हते. मोठ्या विमानतळांसाठीच्या स्वतंत्र जागतिक क्रमवारीत हैदराबादचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगळुरूचे केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, चेन्नईचे चेन्नई विमानतळ आणि कोलकात्याचे नेताजी सुभाष चंद्र बोस विमानतळ अनुक्रमे अकराव्या, पंधराव्या, सोळाव्या आणि अठराव्या स्थानावर आहेत. मध्यम विमानतळांच्या यादीत जयपूर विमानतळ आणि कोची विमानतळ ही अनुक्रमे नवव्या आणि १८व्या स्थानावर आहेत. लहान विमानतळांच्या श्रेणीतील सर्वोत्तम 20 विमानतळांच्या यादीत एकही भारतीय विमानतळ नसल्याचे एअरपोर्टस् कॉन्सिल इंटरनॅशनल-एसीआय वर्ल्डचे महासंचालक लुईस फेलिप डी ऑलिव्हिरा यांनी सांगितले. यासोबतच इंडिगो व एअरएशिया इंडिया या कंपन्या आशिया पॅसिफिक प्रदेशात अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. अमेरिकेतील डेल्टा एअरलाईन्स ही सर्वोत्तम जागतिक विमान कंपनी ठरली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here