बांगलादेशात (Bangladesh Unrest) शेख हसीना यांचे सरकार उलथवून लावल्यानंतर चालू झालेल्या अराजकतेचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. कपडे निर्यातीत मोठा सहभाग असलेल्या बांगलादेशात गेल्या ७ महिन्यांत १४० हून अधिक कापड कारखाने बंद पडले आहेत. बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणार्या वस्त्रोद्योगावर (Bangladesh Garment Industry) संकट आले आहे.
(हेही वाचा – Hindu तरुणाचे अपहरण करून धर्मांधांनी केली मारहाण; इरशाद, शाहबाजसह ९ जणांना अटक)
एक लाखाहून अधिक कामगार बेरोजगार झाले आहेत. गाजीपूर, सावर, नारायणगंज आणि नरसिंदी येथे ५० हून अधिक कारखाने पूर्णपणे बंद पडले आहेत, तर ४० कारखाने तात्पुरते बंद आहेत. ईदनंतर आणखी कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. काही कापड आस्थापनांकडून कामगारांचे वेतन २ ते १४ महिन्यांपासून देण्यात आलेले नसल्याने कामगार रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
कारखाने बंद होत असल्याने २० टक्के मागणी अन्य देशांकडे गेली आहे. यात भारत, व्हिएतनाम, श्रीलंका, इंडोनेशिया आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. कपड्यांचे कारखाने अचानक बंद होण्याची कारणे म्हणजे आर्थिक मंदी आणि राजकीय अस्थिरता. बंद पडणारे बहुतेक कारखाने माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचा पक्ष अवामी लीगशी संबंधित नेत्यांचे आहेत. यामध्ये हसीना यांचे परकीय गुंतवणूक सल्लागार सलमान एफ्. यांचाही समावेश आहे.
कापड कारखाने बंद होण्याच्या संदर्भात सरकारने दावा केला आहे की, बाजारात मागणी नसल्यामुळे उत्पादन थांबले आहे; मात्र ‘गारमेंट वर्कर्स ट्रेड युनियन सेंटर’चे (Garment Workers Trade Union Center) कायदेशीर व्यवहार सचिव खैरुल मामुन मिंटू यांनी हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, मागणी मिळत आहे; परंतु जे कारखाने शिल्लक आहेत, त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत आहे.
कामगार नेते महंमद मिंटू यांनी सांगितले की, ‘बेक्सिमको’ (Beximco) हे वस्त्र क्षेत्रातील एक मोठे आस्थापन होते. ते बंद पडल्याने समस्या निर्माण होत आहे. अनेक मोठे कापड व्यापारी देश सोडून गेले आहेत. त्यामुळे कारखाने बंद पडण्याची समस्या अधिक गंभीर बनली आहे. (Bangladesh Unrest)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community