विशेष प्रतिनिधी,मुंबई
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या निर्देशानुसार मुंबईतील सर्व फलक हटवण्याची मोहिम तीव्र केल्यानंतरही पुन्हा एकदा मुंबई गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बॅनरमय झाली आहे. विशेष म्हणजे हे बॅनर व फलक लावण्यात शिवसेना आणि भाजप पक्षच आघाडीवर आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आणि आयुक्तांच्या आदेशाला आता महापालिकेचे अधिकारीच मानताना दिसत नसून हे अधिकारी पक्षाच्या बॅनरवर कारवाई करायला घाबरता की त्यांना या बॅनरवर कारवाई करून मुंबई बॅनरमुक्त (Banner-Free Mumbai) करण्याची इच्छा नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागील आठवड्यात माझगावसह वांद्रे पूर्व, कलिना सांताक्रुझ आणि अंधेरी आदी भागांमध्ये अस्वच्छता आणि अनधिकृत बॅनरबाजीमुळे बकाल होणाऱ्या मुंबईचे चित्र पाहून चिंता व्यक्त करत मुंबईत स्वच्छता राखली जावी आणि बॅनर काढले जावे अशाप्रकारचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी तातडीने परिपत्रक जारी करत सर्व विभागीय आयुक्त तसेच विभागीय उपायुक्त यांना बॅनर हटवून स्वच्छता मोहिम हाती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी शनिवार रात्रीपासून बॅनर हटवण्याची मोहिम हाती घेण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार महापालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयातील बॅनर व फलकांवर कारवाई केली जात होती.
या सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभापासून सुरु झालेल्या या कारवाईनंतर काही प्रमाणात सुरु झाली असली तरी काही प्रमाणात ही कारवाई थंड पडली. परंतु पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक चौक, पदपथ आणि रस्त्यांवर विविध राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे शुभेच्छा देणारे बॅनर आणि फलक हे झळकू लागले आहेत. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा बरोबरच गणेश स्पर्धेची जाहिरात करण्यासाठीचे बॅनर व फलक मोठ्याप्रमाणात असून ज्या मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार आयुक्तांनी बॅनरमुक्त (Banner-Free Mumbai) मुंबई बनवण्याचे आदेश दिले,त्याच मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेले बॅनर त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले आहेत.
(हेही वाचा-Srikanth Shinde : श्रीकांत एकनाथ शिंदे ‘नव्या पर्वाचा प्रारंभ’)
शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजपचे बॅनर व फलक मोठ्याप्रमाणात पुन्हा झळकू लागले आहेत. त्याबरोबरच मनसे, काँग्रेसच्यावतीने बॅनर मोठ्याप्रमाणात लागेलेले आहे. आयुक्तांच्या निर्देशानंतरही मुंबई पुन्हा विद्रुप होऊ लागल्याने आयुक्तांना जर आपल्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करून घेण्याची हिंमत नाही, तर स्वत:चे आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांचे हसे करुन का घेतात असा सवाल आता जनतेकडून केला जात आहे. या वाढत्या बॅनरबाजीमुळे महापालिकेच्या कोणत्याही विभागात सहायक आयुक्त तसेच संबंधित अधिकारी या बॅनरवर कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे महापालिकेचे अधिकारी हे शिवसेना आणि भाजपवर कारवाई करण्यास घाबरत असून त्यामुळे मनसे आणि काँग्रेसच्याही बॅनरला हात लावले जात नाही.
परिणामी पुन्हा एकदा मुंबई बॅनर व फलकमय झाली आहे. त्यामुळे आता स्वत: आयुक्त या बॅनरवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरतात की पुन्हा निर्देश देत अधिकाऱ्यांना कामाला लावतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. विशेष म्हणजे राजकीय बॅनरवर कारवाई करण्याचे न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असल्याने यावर कारवाई करण्याचे कायद्याचे बळ आहे. तरीही याकडे दुर्लक्ष करत महापालिकेचे अधिकारी मुंबईला विद्रुप करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश पायदळी तुडवत असल्याचे चित्र मुंबईत निर्माण झालेले पहायला मिळत आहे.(Banner-Free Mumbai)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community