Banners : आदित्यला नक्की चिंता कुणाची? मुंबई विद्रुप होण्याची की भाजपाचे बॅनर लागतात याची

145
Banners : आदित्यला नक्की चिंता कुणाची? मुंबई विद्रुप होण्याची की भाजपाचे बॅनर लागतात याची
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुंबईला विद्रुप करणाऱ्या अनधिकृत बॅनर आणि होर्डिंगवर प्रतिबंध करण्याची मागणी केली आहे. मात्र, शिवसेना भवनाच्या प्रांगणात आजवर उबाठा शिवसेनेच्या नेत्यांचे आणि युवा सेनेच्या नेत्यांचे फलक व बॅनर (Banners) लागले जात होते. परंतु राज्य मंत्रीमंडळात वर्णी लागलेल्या मंत्र्यांना शुभेच्छा देणारे फल्क विशेषत: शिवसेना भवन आणि दादर पश्चिम भागांमध्ये लागले जात असल्याने आणि त्या फलक पाहून इच्छित नसल्यानेच अखेर मुंबई विद्रुपतेचा मुद्दा पुढे करून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचे बोलले जात आहे. आदित्य ठाकरे यांना जर या राजकीय बॅनर व प्रतिबंध करायची इच्छा असेल तर आधी त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना आवाहन करून अशाप्रकारे जाहिरातबाजी न करण्याची सूचना केली असती, पण तसे न करता अशाप्रकारे मागणी करून नावापुरती मागणी करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिताना असे म्हटले आहे की, आपण २०२५ मध्ये पदार्पण करताना तसेच, लोकसेवेचा संकल्प करताना, पक्षीय भेदभाव आणि विचारसरणी बाजूला ठेवून; नागरिकांना दिलासा देण्यासाठी राजकीय पोस्टर, बॅनर्स (Banners) आणि होर्डिंग्जवर प्रतिबंध घालून आपण सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेऊ शकता. गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या राजकीय गोंधळामुळे, प्रत्येक शहराच्या कानाकोपऱ्यात हजारो राजकीय पोस्टर (कायदेशीर आणि बेकायदेशीर) पाहायला मिळत आहेत. एक नागरिक म्हणून हे पाहून खेद वाटतो आणि एक व्यक्ती म्हणून शहर विद्रुप करणाऱ्या अशा पोस्टर्सचा त्रास होतो. गेल्या दोन वर्षांत बीएमसीकडून निवडक पोस्टर हटवण्यात आली, तर सत्ताधारी पक्षाचे पोस्टर मात्र तसेच दिसत आहेत.

(हेही वाचा – विधानसभेच्या पराभवावरून Congress मध्ये घमासान; प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग)

सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी आपल्या शहरांमध्ये राजकीय होर्डिंग लावण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यास मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ह्यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे. फडणवीसजी ह्यांनी ‘नो बॅनर’ उपक्रमासाठी पाऊल उचलले, तर आम्हीही त्यांना साथ देऊ असेही आदित्य ठाकरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यापूर्वी मुंबईला विद्रुप होण्यापासून वाचवण्यासाठी प्रथम स्वत:पासून सुरुवात करतानाच आपल्य पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बॅनर (Banners) व फलक न लावण्याच्या सूचना करत आवाहन करणे आवश्यक होते. परंतु आदित्य ठाकरे यांनी तसे न करता केवळ राजकीय स्टंट आणि आपल्याला शहराबाबत आस्था असल्याचे चित्र निर्माण केले असल्याचे बोलले जात आहे.

मागील विधानसभा निवडणुकीनंतर मागील आठवड्यापर्यंत शिवसेना भवनासमोरील सर्व भागांमध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांचेच अधिक बॅनर (Banners) व फलक लागले होते. परंतु महापालिकेने मागील सहा डिसेंबर नंतर केलेल्या कारवाईनंतर येथील भागांसह बॅनर व फलकांवर कारवाई करण्यात आली होती. परंतु, आता त्या जागी आता माहिती तंत्रज्ञान विभाग व सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार आणि मत्स व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणार फलक व बॅनर हे शिवसेना भवन परिसरासह संपूर्ण दादर परिसरात झळकले गेले आहेत. या बॅनरची अॅलर्जी होत असल्याने आदित्य ठाकरे यांच्याकडून ही मागणी केली जात आहे. मात्र, सहा डिसेंबर पूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार अनिल देसाई यांचे रानडे मार्गावरील फलक आजही कायम आहेत, तर याच मार्गावर माजी नगरसेविक प्रिती पाटणकर यांनी लावलेले बॅनरही (Banners) झळकत आहेत, तर दादरमधील गोळ देवळामागे ख्रिस्ती बांधवांना मेरी क्रिसमसच्या शुभेच्छा देणारे शिवसेना उबाठा आमदार महेश सावंत यांचे बॅनर झळकत आहे. त्यामुळे आदित्या ठाकरे यांना मुंबई तथा शहर विद्रुप होते याची चिंता नसून केवळ भाजपाच्या मंत्र्यांची बॅनर जास्त आणि विशेषत: शिवसेना भवन परिसर व मातोश्री परिसरात लागत असल्याने ही चिंता असल्याचे बोलले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.