बीएआरसीचे ऑक्सिजन निर्मितीत पाऊल

बीएआरसीने विशेष प्लान्ट तयार करुन, पाण्यापासून ऑक्सिजनची निर्मिती करायला सुरुवात केली. या प्लान्टमधून, प्रत्येकी ५० लिटर ऑक्सिजनचे सुमारे १० सिलिंडर उपलब्ध केले जाणार आहेत.

140

मुंबईत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर(बीएआरसी)ने मुंबईला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी पाऊल उचलले आहे. बीएआरसीने पाण्यापासून ऑक्सिजनची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. या प्लान्टमधून पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ५० लिटरचे सुमारे १० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होणार आहेत.

मागणीप्रमाणे पुरवठ्याची बीएआरसीची तयारी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत असताना महाराष्ट्राला ऑक्सिजन तुटवड्याची समस्या भेडसावत आहे. अशा परिस्थितीत, खासदार राहुल शेवाळे यांनी बीएआरसीच्या अधिकारी-शास्त्रज्ञांसोबत संपर्क साधून यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर बीएआरसीने विशेष प्लान्ट तयार करुन, पाण्यापासून ऑक्सिजनची निर्मिती करायला सुरुवात केली. या प्लान्टमधून, प्रत्येकी ५० लिटर ऑक्सिजनचे सुमारे १० सिलिंडर उपलब्ध केले जाणार आहेत. हे सिलिंडर दक्षिण-मध्य मुंबईतील सरकारी रुग्णालये आणि कोविड केंद्रांना पुरवण्यात येणार असून, मागणीप्रमाणे पुरवठा वाढवण्याची तयारीही बीएआरसीने दाखविली असल्याची माहिती, शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

(हेही वाचाः झोपडपट्टीत तयार होतात कोरोना टेस्ट किट! एफडीएचा छापा! )

शेवाळेंचा विश्वास

बीएआरसीच्या प्लान्टसोबतच खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स(आरसीएफ) ने गोवंडीच्या शताब्दी(पंडित मदनमोहन) रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट उभारला आहे. तसेच बीपीसीएलच्या वतीनेही असाच प्लान्ट लवकरच कार्यान्वित होणार आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम लवकरच दक्षिण-मध्य मुंबईत दिसून येईल, असा विश्वास शेवाळे यांनी व्यक्त केला.

बीएआरसी बनवते मास्क आणि रिमोट बॉडी टेंपरेचर मशीन

ऑक्सिजन प्लान्ट कार्यान्वित करण्यासोबतच बीएआरसीच्या शास्त्रज्ञांनी नागरिकांच्या वापरासाठी अद्ययावत असे मास्क तयार केले आहेत. हे मास्क एन-९५ पेक्षाही जास्त सुरक्षित असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. तसेच रिमोट बॉडी टेंपरेचर मशीनही बीएआरसीने विकसित केले आहेत.

(हेही वाचाः लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलिस उपअधीक्षक रस्त्यावर! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.