Marine Drive : मरीन ड्राईव्ह परिसरात रस्ते सुरक्षिततेसाठी दुभाजकांमध्ये लावणार ‘बॅरियर्स’

पादचारी अपघात रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून उपाययोजना

287
Marine Drive : मरीन ड्राईव्ह परिसरात रस्ते सुरक्षिततेसाठी दुभाजकांमध्ये लावणार 'बॅरियर्स'
विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील मरीन ड्राईव्ह (Marine Drive) परिसरात पर्यटकांसाठी विविध कामे हाती घेताना याठिकाणी पर्यटकांचा सुरक्षित वावर असावा, यादृष्टीने मुंबई महानगरपालिकेने दुभाजकांमध्ये ‘कडे’ उभारण्याचा अर्थात बॅरियर्स लावण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरुन दुभाजक ओलांडून जाण्याचे प्रकार रोखता येतील, तसेच सुरक्षित ठिकाणाहून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी प्रवृत्त करता येईल.

(हेही वाचा – २०२४चा प्रजासत्ताक दिवस असणार ऐतिहासिक; कर्तव्यपथावर होणार ‘नारी शक्ती’चे दर्शन)

मरीन ड्राईव्ह (Marine Drive) परिसरात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा पुरवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला विविध निर्देश दिले होते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून मरीन ड्राइव्ह परिसरात निरनिराळ्या उपाययोजना देखील हाती घेण्यात आल्या आहेत. याठिकाणी येणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवासुविधा देण्यासाठी उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे आणि ए विभागाचे सहायक आयुक्त शिवदास गुरव यांच्याकडूनही नावीण्यपूर्ण प्रकल्पांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी मरीन ड्राईव्ह परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा ‘हमखास अपघात प्रवण क्षेत्रांचे’ सर्वेक्षण केले होते. सदर सर्वेक्षणामध्ये निर्देशित ठिकाणी पादचाऱ्यांकडून रस्ता ओलांडण्याचे प्रकार रोखता यावे म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी देखील महानगरपालिका प्रशासनाला विनंती केली आहे.

रस्ता दुभाजकांमध्ये उभारणार ‘कडे

ए विभागाच्या हद्दीतील मरीन ड्राईव्ह (Marine Drive) भागात, रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये फॅब्रिकेटिंग आणि रेलिंग बॅरियर्स लावण्यासाठीची प्रक्रिया विभाग कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. अपघातप्रवण भागात हे बॅरियर्स लावण्यात येणार आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त शिवदास गुरव यांनी दिली आहे. दुभाजकांमध्ये बॅरियर्सवरून रस्ता ओलांडणे शक्य होणार नाही, इतक्या उंचीचे हे फॅब्रिकेटेड बॅरियर्स लावण्यात येतील. त्यासोबतच समुद्राच्या दिशेने पाहताना दृश्यमानता कायम राहील, अशा पद्धतीने त्यांची उंची कमी-जास्त ठेवण्यात येणार आहे.

हेही पहा – 

वाहतूक पोलीस आणि रहिवासी संघटनांची मागणी 

रस्ते ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांनी असुरक्षित ठिकाणांची निवड केल्याने या परिसरात काही ठिकाणी अपघात होत असल्याचे मरीन ड्राईव्ह (Marine Drive)वाहतूक पोलिसांचे निरीक्षण आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह वाहतूक पोलीस आणि चर्चगेट परिसरातील रहिवासी संघटनांनी देखील बॅरियर्स लावण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली होती. त्यानुसार एनसीपीए ते प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल दरम्यान पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मज्जाव करणारे बॅरियर्स दुभाजकांमध्ये लावावे, ही मागणी करण्यात आली होती. बॅरियर्सच्या माध्यमातून अपघात टाळता येणे शक्य आहे. त्यासाठीच संपूर्ण मरीन ड्राईव्ह (Marine Drive) परिसरात बॅरियर्स लावण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. याआधी डी विभागातही अशाच पद्धतीच्या बॅरियर्सचा वापर करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार ए विभागाकडून ठराविक परिसरात बॅरियर्स लावण्यात येतील. त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी या उपाययोजना उपयुक्त ठरतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.