राजापूर शहरापासून जवळच असलेल्या बारसू येथील (Barsu Geoglyphs) कातळशिल्पाला राज्य शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. बारसूचे हे कातळशिल्प मध्याश्म युगीन आहे. या कातळशिल्प समुहात एक मनुष्याकृती चित्र आहे. हे कातळ शिल्प बारसू येथील शेतकरी भागोजी बाबाजी जांगळे यांच्या बारसू येथील सर्व्हे क्रमांक २९/२/ब या जमिनीत आहे. राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुराण वस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० अंतर्गत हे समूह क्रमांक २ चे कातळशिल्प केल्याची अधिसूचना जाहीर केली आहे.
या चित्रातील माणसाचे दोन्ही हात वर असून त्यामध्ये त्याने मासा पकडला आहे. त्याच्या डाव्या बाजूने दोन आणि उजव्या बाजूने तीन असे पाच मासे मनुष्याकृतीच्या दिशेने येत आहेत. या माणसाचे पाय पाण्यात असून त्या ठिकाणी दोन मासे आहेत आणि त्याच समांतर रेषेत हवेत उडणारा बगळा दाखवला आहे. त्यामुळे कोकणातील ऐतिहासिक आणि विशेषत्वाने मध्याश्म युगीन मानवाने निर्माण केलेली कलाकृती म्हणून या कातळशिल्पाला महत्त्व आहे.
मानवाच्या कलेची सुरुवात झाल्याचा काळ दर्शवणारे
राज्य संरक्षित झालेल्या या कातळशिल्पाला विशेष महत्त्व आहे. हे कातळशिल्प म्हणजे मानवाच्या कलेची सुरुवात झाल्याचा काळ दर्शवणारे आहे. आजपर्यंत सापडलेल्या २ हजार चित्रांपैकी हे सर्वात महत्त्वाचे कातळशिल्प असल्याचे मत निसर्गयात्री संस्थेचे धनंजय मराठे यांनी सांगितले.
हेही पहा –