मुंबईतील वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पांच्या कामाला गती द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बीडीडी चाळ उच्चाधिकार समितीची बैठक वर्षा येथील समिती कक्षात संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
काय आहे निर्णय?
बी.डी.डी. चाळीमधील पोलिस सेवा निवासस्थानांचा ताबा म्हाडास हस्तांतरित करणे, बी.डी.डी. चाळीमध्ये १ जानेवारी २०११ पर्यंत जे पोलिस कर्मचारी सेवा निवासस्थानात वास्तव्यास आहेत, त्यांना बी.डी.डी. पुनर्विकासांतर्गत ५०० चौ.फु. क्षेत्रफळाच्या पुनर्विकसित गाळ्याचे वितरण बांधकाम खर्चाची रक्कम आकारुन देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. यासंदर्भात गृह विभागासमवेत स्वतंत्र बैठक घेऊन पात्र लाभार्थ्यांची यादी घेतली जावी, असे बैठकीत निश्चित करण्यात आले.
या बाबींवर झाली चर्चा
यापूर्वीही बी.डी.डी चाळीच्या अनुषंगाने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्याच्या अंमलबजावणीचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी घेतला. यामध्ये बी.डी.डी. चाळीतील भाडेकरुंची पात्रता निश्चित करण्यासाठी संचालक, बीडीडी चाळी यांना सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यासंदर्भातील आदेश निर्गमित करणे, बी.डी.डी. प्रकल्पांतील लाभार्थ्यांसोबत करण्यात येणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचा करारनामा नोंदणीकृत करण्यासाठी मुद्रांक व नोंदणी शुल्क रु. १००० प्रति सदनिका इतका करण्याबाबतच्या निर्णयानुसार महसूल व वन विभागाने आदेश/अधिसूचना काढणे, पुनर्वसन इमारतीच्या गाळ्यांचे मालकी तत्वावर करारनामे करण्याकरिता म्हाडास अधिकार प्रदान करण्याची झालेली कार्यवाही, म्हाडाच्या प्रस्तावास अनुसरुन नगर विकास विभागाने अधिसूचनेन्वये बी.डी.डी. प्रकल्पांना असहकार्य करणाऱ्या भाडेकरुंविरुध्द निष्कासनाच्या कार्यवाही बाबत समाविष्ट केलेली तरतुदीची अंमलबजावणी, बी.डी डी. चाळीतील भाडेकरुंना स्थलांतरित करावयाचे असल्यास व त्यांना संक्रमण शिबीर उपलब्ध नसल्यास, अशा निवासी गाळेधारकाला रु.२२,०००/- आणि अनिवासी गाळेधारकाला रु.२५,०००/- प्रती माहे भाडे देण्यासंदर्भात केलेली कार्यवाही याबाबतची माहिती म्हाडाच्यावतीने बैठकीत देण्यात आली.
Join Our WhatsApp Community