बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प : १५४ पात्र पोलीस गाळेधारकांच्या सदनिकांची निश्चिती

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे ना. म. जोशी मार्ग परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये पात्र पोलीस कर्मचारी गाळेधारकांना वितरित करावयाच्या १५४ पुनर्वसन सदनिकांची संगणकीय प्रणालीद्वारे निश्चिती करण्यात आली. या पात्र गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या व मालकी तत्वावर दिल्या जाणाऱ्या पुनर्वसन सदनिकेचा क्रमांक, इमारतीचा क्रमांक, इमारतीतील सदनिकेचा मजला मंगळवारी निश्चित करण्यात आला.

सदनिकांचा क्रमांक संगणकीय प्रणालीद्वारे निश्चित 

वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत ना. म. जोशी मार्ग परळ येथील पोलीस विभागाच्या अखत्यारीतील इमारत क्रमांक १, २, ५, १२ व १३ मध्ये वास्तव्यास असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पुनर्विकासाअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या पुनर्वसन इमारतींमध्ये मालकी तत्वावर मिळणाऱ्या सदनिकांचा क्रमांक यादृच्छिक (Randomised) पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे निश्चित करण्यात आला.

गाळेधारकांसमवेत लवकरच करारनामा

ना. म. जोशी मार्ग परळ येथील बीडीडी चाळीतील इमारत क्रमांक १, २, ५, १२ व १३ पोलीस विभागाच्या अखत्यारीत आहेत. या ५ इमारतींमध्ये एकूण १८२ निवासी गाळे/सदनिका आहेत. या निवासी गाळे/ सदनिकांमध्ये राहणाऱ्या १८२ पैकी १५४ पात्र गाळेधारकांची यादी बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तांनी ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाकडे दिली आहे. या यादीनुसार पात्र गाळेधारकांसाठी सदनिकांची निश्चिती करण्यात आली. प्रस्तावित पुनर्वसन इमारतींत सदनिका निश्चित करण्यात आलेल्या भाडेकरू/ रहिवाशांची यादी म्हाडाच्या https://mhada.gov.in वर प्रसिद्ध केली जाणार आहे. संबंधित गाळेधारकांसमवेत लवकरच करारनामा केला जाणार आहे.

यावेळी उच्चस्तरीय देखरेख समितीचे सदस्य जॉनी जोसेफ, राज्य सूचना व विज्ञान अधिकारी मोईज हुसैन अली, मुंबई विकास विभागाचे संचालक सतीश आंबावडे, उपमुख्य अधिकारी (बीडीडी प्रकल्प) राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा नागरी पुनरुत्थान प्रकल्प असून या प्रकल्पाची जबाबदारी शासनाने म्हाडाकडे सोपविली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here