मुंबईत चौपाटीला भेट देण्यापूर्वी सावधानता बाळगा!

110

मुंबईत पाऊस सुरू होताच दरवर्षी ब्लू बॉटल्स हे समुद्री जीव किनारपट्टीवर दाखल होतात. निळ्याशार रंगाच्या फुगासदृश वाळूवर आढळणाऱ्या ब्लू बॉटल्सला डोळे किंवा पाय नसले तरीही त्यांचा दंश चांगलाच महागात पडू शकतो. गेल्या दोन दिवसांपासून ब्लू बॉटल्स प्रामुख्याने जुहू समुद्रकिनाऱ्यावर दिसू लागले आहेत. त्यामुळे जुहू तसेच गिरगाव, वर्सोवा किनाऱ्याला भेट देताना सावधानता बाळगा, असे आवाहन वनविभागाच्या कांदळवन कक्षाने फेसबुक आणि ट्विटर या समाजमाध्यमांवर केले आहे. अद्याप किनारपट्टीवर लोकांना सावधानता बाळगावी, याबाबत संदेश देणारे फलक लावायला कांदळवन कक्षाला मुहूर्त मिळालेला नाही.

( हेही वाचा : राज्यात पावसाचा हाहाकार; वाहतूक ठप्प, अनेक मार्ग बंद!)

मुंबई मरिन रिस्पॉन्डन्ट ग्रुप या समुद्री परिसंस्थेवर काम करणा-या तसेच समुद्री जिवांविषयी जनजागृती करणा-या स्वयंसेवकांना किनारपट्टीवरील फेरफटक्यात ब्लू बॉटल्स दिसू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईच्या समुद्रकिना-यावर ब्लू बॉटल्स दिसत आहेत. पण मध्यंतरीच्या काळात ते किनारपट्टीवरुन नाहीसे झाले होते. आता यंदाच्या आठवड्याच्या सुरुवातीपासून त्यांचे किना-यावर पुन्हा दर्शन होऊ लागले आहे. त्यांच्या शारिरीक रचनेमुळे त्यांना ‘पोर्तुगीज मॅन ऑ वॉर’ असेही संबोधले जाते. ब्लू बॉटल्सच्या धागेसदृश्य शेपटीवर पाय पडल्यास कित्येकदा पायाला लाल चट्टे उमटतात. वेदना असह्य होत असल्यास कित्येकांना रुग्णालयात उपचारही घ्यावे लागतात.

New Project 3 6
हर्षल कर्वे, सागरी जीवशास्त्रज्ञ, कांदळवन कक्ष, वनविभाग

कांदळवन कक्षाने समाजमाध्यमांवर दिलेली माहिती 

  • ब्लू बॉटल हे समुद्री जीव पावसाळ्यात मुंबईच्या चौपाटीवर दिसतात.
  • जेलीफिश सारख्या दिसणा-या या जीवांना एक ते पाच मिमी लांबीचा पारदर्शक फुगा असतो आणि त्याखाली निळ्या रंगाचे धागे (शुंडक) असतात.
  • त्यांच्या निळ्या रंगाच्या विषारी दो-यांना (शंडकांना) स्पर्श झाल्यास ते दंश करतात जो अतिशय वेदनादायी असतो.
  • किना-याला लागल्यावर त्यांच्यापैकी बहुतेक जीव मृतावस्थेत वाटले तरीही ते दंश करु शकतात.
  • या दंशापासून वाचण्यासाठी सावधगिरी म्हणून पावसाळ्यात समुद्रावर जाऊ नका आणि चौपाटीवर अनवाणी फिरु नका.
  • ब्लू बॉटलचा दंश झाल्सास तो भाग चोळू नका. दंश झालेल्या भागावर हळूवारपणे समुद्राचे पाणी ओतावे किंवा कोमट पाणी ओतावे. रुग्णाला तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करावे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.