सावधान! रस्त्यावर थुंकल्यास आता पोलिस कारवाई!

अशाप्रकारे जे कुणी सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करतील, त्याबाबत नागरिकांनी १०० क्रमांकाला कळवावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

117

राज्यातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे आता मुंबई पोलिसांनी स्वच्छतेवरही विशेष भर दिला आहे. जे कोणी नागरिक रस्त्यावर थुंकून घाण करतील, त्यांच्यावर आता थेट पोलिस कारवाई करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी संबंधित नागरिकांवर कलम ११७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९६० अन्वये कारवाई करण्यात येणार आहे, तसे प्रसिद्धीपत्रक मुंबई पोलिसांनी काढले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावरून घेतला निर्णय!

या प्रसिद्धिपत्रकानुसार, मुंबई उच्च न्यायालयात ७ एप्रिल २०२१ रोजी अस्मीन वांद्रेवाला यांनी जनहित याचिका दाखल केली होती. न्यायालयाने यावर मुंबई पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार मुंबई पोलीस प्रशासनाने बिनतारी संदेशाद्वारे मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवले आहे कि, ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक थुंकून घाण करतील, अशा ठिकाणाची माहिती घेऊन त्यांच्यावर कलम ११७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९६० अन्वये कारवाई करण्यात यावी, असे यात म्हटले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांचे यामुळे जे दुष्परिणाम होतील, त्याबाबत ध्वनीक्षेपकावरून त्यांचे प्रबोधन करण्यात यावे, असेही म्हटले आहे.

(हेही वाचा : मुंबईच्या रस्त्यावर ‘हे’ स्टिकर असणाऱ्या वाहनांनाच परवानगी!)

…तर नागरिकांनी १०० क्रमांकावर तक्रार करावी! 

मुंबई पोलिसांनी अशाप्रकारे जे कुणी सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करतील, त्याबाबत नागरिकांनी १०० क्रमांकाला कळवावे, असेही आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. यापुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यात येऊ नये, यासाठी मुंबई पोलिस जनजागृती करणार असून त्याविषयी प्रबोधन ममोहीम काढणार आहेत, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.