सावधान! २ दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस!

'तौकते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने वर्तवलेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेच्या सर्व संबंधीत यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

153

अरबी समुद्रात ‘तौकते’ नावाचे चक्रीवादळ तयार होत असून हे चक्रीवादळ १५, १६ मे २०२१ रोजी मुंबईच्या नजीक येण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे धोकादायक झाडांची छाटणी करणे, समुद्र किनाऱ्याजवळील पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या वस्त्यांबाबत सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करणे, पाणी तुंबण्याची शक्यता असणा-या ठिकाणी उदंचन संचाची व्यवस्था करणे, मुख्य ६ चौपाट्यांवर पूरबचाव पथके साधनसामुग्रीसह तैनात ठेवणे, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज ठेवणे आणि या अनुषंगाने नागरिकांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त इकबाल सिंह यांनी दिले आहेत. तसेच नागरिकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.

‘तौकते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने वर्तवलेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधीत यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या नेतृत्वात आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे व योग्य ती कार्यवाही केली जात आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

मुंबईतील समुद्र किनारी असणा-या ज्या वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असते, त्या वस्त्यांबाबत विभागस्तरीय कार्यालयांद्वारे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. त्याचबरोबर विभागातील तात्पुरत्या निवा-याची ठिकाणे स्वच्छ करुन सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच सर्व २४ विभागीय नियंत्रण कक्ष आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह सुसज्ज ठेवण्यात आले आहेत.

(हेही वाचा : ‘या’ कारणांमुळे मुंबईत लसीकरणाचा सावळागोंधळ! )

पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी पंप तयार!

मुंबईत ज्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी उदंचन संचांची (पंप) व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या ठिकाणी ‘रिफ्लेक्टीव्ह जॅकेट’ परिधान केलेल्या कामगारांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांवर साचलेला कचरा स्वच्छ करण्यात येत आहे.

पूर बचाव पथके तैनात!

वेगाने वारे वाहण्याची शक्यता व पर्जन्यवृष्टीची संभाव्यता लक्षात घेऊन मुंबईतील ६ चौपाट्यांवर पूरबचाव पथके तैनात करण्याचे निर्देश मुंबई अग्निशमन दलास देण्यात आले आहेत. तसेच या सर्व ठिकाणी मुंबई पोलिसांच्या मोबाईल व्हॅन्स कार्यतत्पर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व चौपाट्यांवर नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

सर्व दलांची मदत घेणार!

आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज व सतर्क असून या यंत्रणेस हवामान खात्याकडून प्राप्त अंदाज व चक्रीवादळाबाबतच्या सूचना व सतर्कतेचे संदेश सर्व संबंधितांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आवश्यकतेनुसार नौदल, तटरक्षक दल, थलसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांची मदत आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याची कार्यवाही देखील आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.