गोरेगाव पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात येणार असून या उद्यानाच्या नुतनीकरणावर तब्बल पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या उद्यानाचे सुशोभिकरण जिल्हा नियोजन समितीच्यावतीने निधी मंजूर करत महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश यापूर्वीचे उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला निधी महापालिकेला प्राप्त होणार असल्याने महापालिकेने निविदा मागवली. परंतु हा निधी अद्याप मिळालेला नसतानाही कंत्राटदाराची नेमणूक करून प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या उद्यानाचा कायापालट कोणाच्या निधीतून होणार आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
( हेही वाचा : MPSC च्या विद्यार्थ्यांचे १० तासांपासून पुण्यात आंदोलन; या आहेत मागण्या… )
गोरेगाव पश्चिम येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यानाला बकाल स्थिती प्राप्त झाल्याने या उद्यानाच्या विकासासाठी तत्कालिन पालकमंत्र्यांनी डिपीडीसी अंतर्गत निधी मंजूर करून महापालिकेला उपलब्ध करून दिला. त्या निधीतून महापालिकेच्या नियोजन विभागाने, या उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभिकरण करणे, शौचालयांची दुरुस्ती करणे, तसेच विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी कामे करण्यासाठी कंत्राटदाराची निवड केली आहे. यामध्ये उद्यानाचे सौंदर्यीकरण करताना विद्युत दिवे बसवून विद्युत रोषणाई करणे तसेच उद्यानातील तुटलेल्या अवस्थेत असलेले लहान मुलांचे खेळणी बदलणे, तुटलेले कंपाऊंड दुरुस्त करणे, वरिष्ठ नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्थ करणे, तिवरांबाबत माहिती फलक, गार्डन व्ह्यू बघण्यासाठी डेक उभारणे, तसेच लँडस्केपिंग, वृक्षरोपण व इतर हिरवळीची कामे करणे, उद्यानामध्ये योगा तसेच व्यायाम करण्यासाठी विशेष जागा उपलब्ध करणे आदी कामांचा समावेश सुशोभिकरणामध्ये आहे.
या कामांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये यश रिषभ ब्रदर्स ही कंपनी पात्र ठरली असून यावर विविध करांसह ५.६४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला निधी महापालिकेला प्राप्त होईल म्हणून महापालिकेच्या नियोजन विभागाने निविदा मागवली आणि पात्र कंत्राटदाराची नेमणूक केली. परंतु कंत्राटदाराची नेमणूक झाल्यानंतरही जिल्हा नियोजन समितीचा निधी महापालिकेला प्राप्त झालेला नाही.त्यामुळे प्रशासकांनी प्रस्ताव मंजूर केल्यानंतरही महापालिकेने कंत्राटदाराला काम करण्याचा कार्यादेश दिलेला नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा निधी प्राप्त झाल्यानंतरच या कामाचा कार्यादेश देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या उद्यानाचा कायापालट आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणार की महापालिकेला स्वत:चा निधी खर्च करून याचा विकास करावा लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Join Our WhatsApp Community