सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे, त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे, परंतु त्या तुलनेत आरोग्य व्यवस्था तोकडी पडत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन असो कि ऑक्सिजन या सगळ्यांचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढत आहे. राज्यातील बीड जिल्ह्यातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. इथे तर मृतदेहही वाहून नेण्यासाठी शववाहिनी किंवा रुग्णवाहिका नसल्याने एका रुग्णवाहिकेतून तब्बल २२ मृतदेह स्मशानात आणण्यात आले.
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाची दयनीय अवस्था!
बीडमधील ही दयनीय अवस्था पाहून प्रत्येकाचे मन हेलावून जात आहे. बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील स्वामी रामानंदतीर्थ रुग्णालयातील उपरोक्त विदारक स्थिती आहे. एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीत आणलेले ते २२ मृतदेह हे याच रुग्णालयातील होते. रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याकडे रुग्णवाहिका किंवा शववाहिनी नसल्याने दुर्दैवाने २२ मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले, असे सांगितले आहे.
(हेही वाचा : राज्यात आणखी लॉकडाऊन वाढणार?)
महिनाभरापूर्वी ५ रुग्णवाहिकांची केलेली मागणी
विशेष म्हणजे रुग्णालय प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला १७ मार्च रोजीच ५ रुग्णवाहिका पुरवण्यासाठी लेखी मागणी केली आहे, परंतु अद्याप जिल्हा प्रशासनाने त्या पुरवल्या नाहीत, त्यामुळे ही अवस्था निर्माण झाली आहे. बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील स्वाराती रुग्णलायचीही तीच अवस्था आहे. या ठिकाणी आजूबाजूचा गावांमधून रुग्ण येत आहेत. त्यामुळे रुग्णालयावर ताण पडत आहे.
Join Our WhatsApp Community