भिकाऱ्यांचीही पसंती वातानुकूलित लोकलला

107

थंडाथंडा कुलकुल प्रवासाचा अनुभव देणाऱ्या वातानुकूलित लोकल (एसी) मधील गर्दी आता दिवसेंदिवस वाढत जात असून या लोकलचे तिकीट तथा पासधारकांनाही आता फुकट्या आणि जनरलच्या डब्यातील अतिक्रमणामुळे बसण्यास जागा मिळत नाही किंबहुना डब्यात शिरताही येत नाही. वाढत्या उष्म्यामुळे सर्वच प्रवाशांना आता वातानुकूलित लोकलची भुरळ पाडलेली असतानाच भिकाऱ्यांचीही पहिली पसंती आता या लोकलला असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून एसी लोकलमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढलेली असून त्यांच्या या वाढत्या संख्येमुळे प्रवासीही हैराण झाले आहेत.

रेल्वे मंत्रालयाने पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. या लोकलला सुरुवातीला प्रतिसाद कमी मिळाल्याने यांच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढली. परंतु प्रत्यक्षात मासिक पासधारक आणि दैनदिन तिकीट धारक यांचे प्रमाण या लोकलमधील प्रवाशांची संख्या मर्यादीत होती. परंतु सकाळी आणि संध्याकाळी प्रत्यक्षात तिकीट तपासनीस (टिसी) या लोकलमध्ये येत नसल्याने दृतीय श्रेणीतील व प्रथम श्रेणीतील प्रवाशी तसेच विनातिकीट प्रवास करणारे प्रवासीही आता बिनधास्तपणे वातानुकूलित लोकलमधून प्रवास करु लागले आहेत. परिणामी लोकलमधील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली पहायला मिळत असून या एसी लोकलचे तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश मिळत आणि मिळाला तरी गर्दीतून उभ्याने प्रवास करावा लागत आहे.

(हेही वाचा अमेरिकेसाठी धोक्याची घंटा; तुर्कस्तानसारखी होऊ शकते परिस्थिती )

या वातानुकूलित लोकलमध्ये पुस्तक, पेन विकणारे आणि या विक्रीतून भिक मागणारेही मोठ्या प्रमाणात असून लहान मुलांना कडेवर घेऊन भिक मागणाऱ्या महिलांचाही मोठ्या प्रमाणात वावर असतो. विशेष म्हणजे ढोलकी वाजवून गाणे म्हणणाऱ्यांचा आता सर्रास वावर वाढला आहे. वातानुकूलित लोकल ही बंदिस्त असल्याने ढोकलीवरील थापांचा आवाज मोठ्या प्रमाणात घुमत असल्याने याचा त्रास प्रवाशांना होतो. त्यामुळे आधीच फुकट्या प्रवाशांमुळे एसी लोकलमधील प्रवाशी त्रस्त असताना आता भिकाऱ्यांच्या राबत्यामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे. एसी लोकल सुरु झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने प्रत्येक लोकलमध्ये तिकीट तपासनीस असेल असे जाहीर केले होते. त्यानुसार काही महिने तिकीट तपासनीस नियमित तपासणी करून फुकट्या प्रवाशांना दंडही करत होते. परंतु आता तिकीट तपासनीस यांचे दर्शन एसी लोकलमध्ये होणेही दुर्मिळ झाले असून या लोकलमध्ये टिसी येत नाही पक्की खात्री प्रवाशांना झाल्याने सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लासच्या प्रवाशांसह फुकटे प्रवासीही बिनधास्तपणे या लोकलमधून प्रवास करताना दिसत आहे. त्यामुळे याकडे रेल्वे प्रशासनाचेही लक्ष नसून तिकीट तपासनीस यांच्या मेहरबानीमुळेच फुकटे प्रवाशी एसी लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

याबाबत भिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणतात, टिसी आम्हाला काय दंड करणार आणि आम्ही तरी कुठून भरणार! फार फार तर ते आम्हाला लोकलमधून खाली उतरवतील. पण जेव्हा हटकतील आणि खाली उतरायला सांगतील तेव्हा उतरु. पण वाढत्या गरमीमुळे थोडी एसीची हवा तरी य लोकलमधून घेता येते आणि भिकही मागता येत असल्याने एसी लोकल असेल तर त्यातूच भिक मागण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.