इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास सरकार सुद्धा सामान्य नागरिकांना प्रोत्साहन देत आहे. ई-वाहने खरेदी करणाऱ्या मुंबईकरांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये मुंबई शहरात तब्बल ३३० ई-चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. या चार्जिंग स्टेशनवर सर्व प्रकारची सुविधा असल्याने ई-वाहन खरेदी करणाऱ्यांना सोयीस्कर प्रवास करता येणार आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी पुरेशी केंद्र उपलब्ध नसल्याने आतादेखील नागरिक पेट्रोल-डिझेलच्या वाहनांचा वापर करत आहेत. नागरिकांना इमारत-घराच्या परिसरात आणि कार्यालयीन ठिकाणांजवर चार्जिंग सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बेस्टने ३३० चार्जिंग स्टेशन उभारणीचे काम हाती घेतले आहे. यापैकी अनेक चार्जिंग स्टेशनचे काम हे पूर्ण झाले असून मार्चपर्यंत हे चार्जिंग स्टेशन कार्यान्वित होतील असे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
या चार्जिंग स्टेशनवर नागरिकांना तीन चाकी, चार चाकी, व्हॅन, बस अशा सर्व वाहनांना चार्जिंग करता येणार आहे. बेस्ट बसेससह ही चार्जिंग स्थानके सार्वजनिक वापरासाठीही खुली राहतील. या केंद्रांवर नागरिकांना माफक दरामध्ये चार्जिंग करण्यात येणार आहे अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. बोरिवली नॅन्सी कॉलनी परिसरात एसटी थांब्यासह रेल्वे स्थानक परिसरात चार्जिंग स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चार्जिंग स्टेशन सुविधा कुठे सुरु होणार?
कुलाबा, मुंबई सेंट्रल, वरळी, वडाळा, वांद्रे, प्रतीक्षा नगर, धारावी, महेश्वरी उद्यान, सांताक्रूझ, देवनार, शिवाजी नगर, विक्रोळी, घाटकोपर, मुलुंड, कुर्ला, मरोळ, दिंडोशी, मागाठणे, गोरेगाव, ओशिवरा, मालवणी, पोईसर, गोराई, मालाड, बॅकबे आणि आणिक आगार अशा एकूण २६ बेस्ट आगारांमध्ये ३३० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.