मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार; बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार ५०० एसी बसगाड्या

100

बेस्टच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत ५०० हून अधिक वातानुकूलित बस दाखल होणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षी मुंबईकरांना बेस्टच्या जवळपास सर्वच गाड्यांमधून गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. या एसी बसेस मिडी, मिनीऐवजी १२ मीटर लांबीच्या असतील. तर काही दुमजली वातानुकूलित गाड्या सुद्धा उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

( हेही वाचा : बेस्ट कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन)

बेस्टच्या ताफ्यात एसी बसेस दाखल होणार

मिनी, मिडी बसेसमध्ये प्रवासी वाहक क्षमता तुलनेने कमी असते. एकूण बस ताफ्यामध्ये १७०० हून अधिक बस मिनी, मिडी स्वरुपाच्या आहेत, परंतु या मिनी, मिडी बसेसमध्ये प्रवासी वाहक क्षमता तुलनेने कमी असते. परिणामी प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन उपक्रमाकडून डिसेंबर २०२२ पर्यंत भाडेतत्वावरील १२ मीटर लांबीच्या ५०० वातानुकूलित बसेस दाखल करण्यात येणार आहेत.

५०० बसमध्ये बहुतांश बस या एकमजली असतील तर काही बसेस दुमजली असणार आहेत. १८ ऑगस्टला पहिली दुमजली वातानुकूलित बस बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे. ही बस सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत येईल. येत्या काही वर्षांत बेस्टच्या ताफ्यात ९०० वातानुकूलित दुमजली बस मुंबईत धावणार असून पहिल्या टप्प्यात २०० दुमजली बसचा ताफ्यात समावेश करण्यात येणार आहे.

प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक

बेस्टकडे १५ वर्षांपूर्वी ९०१ दुमजली बस होत्या. डिसेंबर २०१९ पर्यंत या बसचा ताफा १२० होता आता दुमजली बसची संख्या ४५ आहे. एकमजली बसमधून ५४ ते ६० प्रवासी प्रवास करू शकतात. मात्र दुमजली बसची क्षमता ७४ आहे. एकमजली आणि दुमजली बसचे आकारमानही सारखेच असते. त्यामुळे या दोन्ही प्रकारातील बस रस्ता व्यापण्याचे प्रमाण सारखेच आहे. त्यामुळे दुमजली बसमधून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक असल्यामुळे उपक्रमाकडून दुमजली बसची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.