बेस्ट उपक्रमाच्या कर्मचारी-कर्मचाऱ्यांना दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा व्हावा याकरता यावर्षी त्यांना मुंबई महापालिकेच्या धर्तीवर सानुग्रह अनुदान देण्यात यावे,अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपचे बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी बेस्ट समिती अध्यक्षांकडे ही मागणी करत याचा अहवाल समितीच्या पटलावर ठेवण्याचीही मागणी केली आहे.
महापालिकेनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा निर्णय
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदान देण्याची अद्यापही घोषणा झालेली नाही. महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाची घोषणा झाल्यांनतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे भाजपचे बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी समिती अध्यक्षांना ठरावाच्या सूचनेद्वारे विनंती करत महापालिकेच्या धर्तीवर बेस्ट कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली आहे.
(हेही वाचाः सानुग्रह अनुदानाचा महापालिका प्रशासन आणि महापौरांना विसर)
कोविड काळात बेस्ट कर्मचाऱ्यांनी पार पाडले कर्तव्य
बेस्ट उपक्रमातातील कर्मचारी मागील दीड वर्षांपासून कोविडमुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत मुंबईकरांना अत्यावश्यक सेवा पुरवून आपले कर्तव्य पार पाडले होते. उपक्रमाच्या महाव्यवस्थापकांनी उपक्रमाचे सन २०२२-२३ या वर्षांचे अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक बेस्ट समितीला सादर करताना उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी कोविड १९मुळे निर्माण झालेल्या टाळेबंदीच्या काळात केलेल्या कामगिरीबाबत गौरवोद्गार काढले होते. उपक्रमाचे कर्मचारी यावर्षीही दिवाळी सणाचा आनंद साजर करण्यासाठी उपक्रमाकडून जाहीर होणाऱ्या सानुग्रह अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगत ही दिवाळी भेट दिल्यास खऱ्या अर्थाने ते कौतुकास्पद ठरेल,असेही त्यांनी नमुद केले आहे.