मुंबईत २७ तास मेगाब्लॉक! बेस्ट प्रशासनाकडून नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था; ३५ अतिरिक्त गाड्यांचे नियोजन

मध्य रेल्वे मार्गावर ब्रिटीशकालीन कर्नाक बंदर पूल पाडण्यासाठी तब्बल २७ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान, सीएसएमटी ते भायखळा दरम्यान रेल्वेसेवा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री १०.३० वाजल्यापासून ते रविवार सकाळी ६.३० पर्यंत बेस्टकडून १२ अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार आहेत.

( हेही वाचा : मुंबईत सीटबेल्ट न लावणाऱ्या ९ हजार प्रवाशांवर कारवाई)

कर्नाक पूल पाडण्याचे काम शनिवार १९ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक २७ तास घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.

सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची रेल्वे वाहतून मध्य रेल्वेने पूर्णपणे बंद ठेवली आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने १२ अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रविवारी इतर काही मार्गावर बेस्टच्या आणखी ३५ गाड्या चालवल्या जाणार आहे.

बेस्ट उपक्रमाकडून विशेष सुविधा 

  • ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने बेस्ट उपक्रम आणि एसटी महामंडळाकडे दादर, परेल, भायखळा ते सीएसएमटी दरम्यान जादा बसगाड्या सोडण्याची मागणी केलेली आहे.
  • या मागणीनुसार बेस्टने १९ नोव्हेंबरला रात्री १०.३० वाजल्यापासून ते २० नोव्हेंबर पहाटे ६.३० पर्यंत ४७ जादा बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • बस क्रमांक ९ वडाळा ते कुलाबा आगार, बस क्रमांक १ सीएसएमटी ते दादर स्थानक पूर्व आणि बस क्रमांक २ भायखळा पश्चिम ते कुलाबा आगारापर्यंत १२ गाड्या सोडण्यात येतील.
  • बस क्रमांक ११, सी १०, १४, ए-१७४, ए४५ अशा एकूण ३५ बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.
  • एसटी महामंडळाकडून नियोजन सुरू असून प्रवाशांच्या गरजेनुसार बसगाड्या सोडण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here