बेस्टच्या बसेस आता भर रस्त्यात बंद पडत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी ते जून या कालावधीत मुंबईत बेस्ट बस बंद पडण्याच्या (BEST Bus Breakdowns) २११ घटनांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ७५ टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे आता बेस्ट बसच्या देखभाल-दुरुस्तीविषयी पुन्हा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गेल्या वर्षी अशा बस रस्त्यात बंद पडण्याच्या एकूण १२० घटना घडल्या होत्या. यंदा फक्त सहा महिन्यांतच २११ घटनांची नोंद झाली आहे. यंदा बस बंद पडण्याच्या सर्वाधिक घटना वाकोला येथे घडल्या आहेत. वाकोला परिसरात तब्बल ५६ वेळा बस ब्रेकडाऊनच्या घटना घडल्या आहेत. बस बंद पडल्याने वाहतुकीला होणारे अडथळे लक्षात घेऊन आता वाहतूक विभागाचे सह आयुक्त अनिल कुंभारे यांनी बेस्ट प्रशासनाला एक पत्र लिहिले आहे.
(हेही वाचा – Spicejet Airline company: अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली, कारण काय ? जाणून घ्या…)
बेस्टचे व्यवस्थापन पथक सज्ज हवेत
वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे की, “बस बंद पडली की, ती टोइंग करण्यासाठी योग्य क्षमतेची क्रेन उपलब्ध करून देणे खूप अडचणीचे ठरते. त्यात इलेक्ट्रिक बस असेल, तर टेक्निशिअन घटनास्थळी आल्याशिवाय काहीच करता येत नाही. बेस्टच्या ताफ्यात सध्या ३१३३ बसेस आहेत. त्यात ६१६ इलेक्ट्रिक, १९९२ सीएनजी आणि ५२५ डिझेलवर धावणाऱ्या आहेत. बेस्टचे व्यवस्थापन पथक आणि क्रेन्स वेगवेगळ्या ठिकाणी सज्ज असायला हवेत. ही पथकं एकतर बेस्टच्या दोन झोनमध्ये (दक्षिण-मध्य आणि पूर्व-पश्चिम) किंवा मग पाच पोलीस हद्दीत (उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि मध्य) तैनात असावीत.”
सर्व यंत्रणा हाताशी – बेस्ट
दुसरीकडे बेस्ट वर्कशॉपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेस्टकडे टोइंग आणि दुरुस्तीसाठीच्या योग्य सुविधा उपलब्ध आहेत, असे म्हटले आहे. ते म्हणाले, “आमच्याकडे सात ब्रेकडाऊन व्हॅन्स आणि बस टोइंगसाठी दोन वाहनं आहेत. त्यासोबतच आमच्याकडे बस कंट्रोल सेक्शन असून त्यात व्यवस्थापनासाठी पूर्णवेळ पथक आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात बऱ्याच कंत्राटी पद्धतीवरच्या गाड्या आहेत. त्या गाड्या ब्रेकडाऊन होतात. त्यामुळे आम्ही खासगी ऑपरेटर्सना देखभाल दुरुस्तीसाठी अतिरिक्त कर्मचारी आणि वाहनं उपलब्ध करून देण्यास सांगितलं आहे.” (BEST Bus Breakdowns)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community