बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नियोजित ठिकाणी पोहोचण्यासाठी आणखी एक वाहतूक पर्याय उपलब्ध होणार आहे. बेस्ट उपक्रमाने मुंबईत प्रथमच विजेवरील दुचाकी (इलेक्ट्रिक बाईक) सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अंधेरीत या सेवेची चाचणी सुरू आहे, ही चाचणी यशस्वी झाल्यावर संपूर्ण मुंबईत ही सेवा सुरू करण्यात येणार आहे असे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या ताफ्यात येणार Digital बसेस; प्रवाशांचीही पसंती!)
बेस्ट थांब्यांवर ई-बाईक सेवा
या इलेक्ट्रिक दुचाकी बेस्ट थांब्याच्या बाजूलाच उभ्या करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. अंधेरीत हा प्रयोग सुरू केला असून संबंधित कंपनीकडून सात दुचारी सध्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या दुचाकीचा वेग प्रतितास २५ किलोमीटर इतका असले. प्रति तीन किलोमीटर प्रवास आणि मूळ भाडे २० रुपये असेल आणि दीड रुपये प्रति मिनिट आकारले जातील.
ही दुचाकी वापरण्यासाठी प्रवासी सध्या वोगो अॅपचा वापर करू शकतात. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर ही सुविधा चलो अॅपच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. तसेच बेस्ट बस पास आणि सुपर सेव्हर योजनेचे वापरकर्तेही दुचाकी वापरू शकतात. यामुळे बस थांब्यावर उतरून प्रवाशांना खासगी वाहनांची वाट न पाहता या दुचाकीने आपल्या इच्छितस्थळी पोहोचता येईल. ऑफिस जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुविधेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
बेस्टेन अॅपआधारित विजेवरील दुचाकीसाठी एका कंपनीसमवेत भागीदारी केली आहे. यामुळे जास्तीत जास्त प्रवासी जोडले जाऊन बेस्टला उत्पन्न मिळावे म्हणून हा प्रयोग करण्यात आला आहे. प्रमुख बस थांबे, व्यावसायित क्षेत्र, निवासी क्षेत्र इत्यादींना ही सेवा जोडण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
सध्या सुरू असणारी सेवा
- अंधेरी पूर्व डायनेस्टी बिझनेस पार्क
- जेबी नगर मेट्रो स्टेशन
- आकृती स्टार
- चकाला औद्योगिक क्षेत्र
- टेक्नोपोलिस नॉलेज पार्क
- आगरकर चौक बसस्टॉप
- सहार रोड
- रेल्वे कॉलनी